बेळगाव : तुझ्या नावे असलेली मालमत्ता आपल्या नावे कर, असे प्रियकर प्रेयसीला वारंवार सांगत होता. परंतु, तिने त्याकडे सातत्याने दुर्लक्ष केल्याने संतापाच्या भरात प्रियकराने प्रेयसीचा ओढणीने गळा आवळून खून केला. 5 मार्च रोजी घडलेली ही घटना बुधवारी 11 रोजी मृतदेह सापडल्यानंतर उघडकीस आली.
सुजाता तेजू पवार (वय 34, मूळ रा. हारूगेरी, सध्या रा. माहेर अथणी) असे मृत महिलेचे नाव आहे. तिच्या खुनाबद्दल कुमार कल्लाप्पा हवालदार (रा. अथणी) याच्यावर अथणी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मृत सुजाता ही मूळची अथणीची असून तिला हारूगेरी येथे लग्न करून दिले होते. परंतु, पतीसोबत पटत नसल्याने ती गेल्या काही महिन्यांपासून माहेरी अथणी येथे येऊन राहात होती. तिने स्वतः अथणी येथे घर बांधले आहे. या काळात तिच्याशी कुमार याने मैत्री करत नंतर प्रेमाच्या जाळ्यात ओढले. यानंतर त्याने सुजाताला, ‘माझ्याशी लग्न कर आणि तुझ्या नावावरचे घर व मालमत्ता माझ्या नावे कर’ असा तगादा लावला होता. परंतु, ती त्याला प्रतिसाद देत नव्हती.
गळा आवळला
5 मार्च रोजी दुपारी तीनच्या सुमारास कुमार सुजाताला दुचाकीवरून घेऊन अथणी शहराबाहेर असलेल्या उसाच्या शेतात घेऊन गेला. तिथे त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर त्याने ओढणीने गळा आवळून तिचा खून केला. मृतदेह तेथेच टाकून तो पसार झाला.
आठवडाभराने मळ्यात दुर्गंधी उठल्याने शेतकऱ्यांनी जाऊन पाहिले असता सुजाताचा मृतदेह आढळून आला. मृत महिलेची अथणी पोलिसांनी ओळख पटवली. यानंतर तिची आई लिलावती भीमाप्पा हुगार (वय 60, रा. पारशेट्टी गल्ली, अथणी) यांच्याकडून फिर्याद लिहून घेत कुमार याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. याचा पुढील तपास अथणी पोलिसांकडून सुरू आहे.