खानापूर : ऐन लग्नसराई, गृहप्रवेश, यात्रांच्या हंगामात गॅसटंचाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. खानापूर तालुक्यात मागणीच्या तुलनेत निम्म्याहून कमी सिलिंडर पुरवठा होत असल्याने घरगुती आणि व्यावसायिक सिलिंडर मिळवण्यासाठी जीवघेणी धावपळ करावी लागत आहे.
यात्रा, सार्वजनिक पूजा, लग्न सोहळे, गृहप्रवेश यासारख्या कार्यक्रमांमध्ये जेवणाची व्यवस्था करताना गॅस टंचाईमुळे प्रचंड गैरसोय होत आहे. शहरातील हॉटेल आणि रेस्टॉरंटमालकांनी यापूर्वीच चुलीचा आधार घेतला आहे. त्याशिवाय मेन्यू कार्डवरील खाद्यपदार्थ अर्ध्यावर आणले आहेत. ज्या खाद्यपदार्थांसाठी गॅसचा अधिक वापर होतो असे खाद्यपदार्थ मेनू कार्डमधून बाजूला केले आहेत. सध्या ५०० रुपये क्विंटल इतका लाकडाचा दर परवडणारा असला तरी सगळ्याच हॉटेल व रेस्टॉरंटमध्ये चुलीवर स्वयंपाक करणे शक्य नसल्याचे दिसून येत आहे. जागेचा अभाव, धूर आणि सुरक्षेच्या कारणास्तव गर्दीच्या ठिकाणी असलेल्या हॉटेल आणि रेस्टॉरंट चालकांना चुलीचा आधार घेणे अशक्य झाले आहे.
एकूणच घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या टंचाईबरोबरच व्यावसायिक वापराच्या गॅस सिलिंडरची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. मे आणि जून महिन्यात यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
ज्या घरामध्ये लग्न सराईची धांदल सुरु आहे. तेथील लोकांना गॅसची व्यवस्था करताना नाकीनऊ येत आहे. सिलिंडर वितरणासाठी ओटीपी सक्तीचा करण्यात आला आहे. तथापि काही ठिकाणी ओटीपींचा गैरवापर करुन ओळखीच्या व मर्जीतल्या लोकांना सिलिंडर देण्याचा प्रकार घडत असल्याची चर्चा आहे. तहसीलदार तसेच अन्न व नागरी पुरवठा खात्याच्या अधिकाऱ्यांनी गॅस टंचाईची झळ दूर करण्यासाठी आवश्यक उपाययोजना आखावी अशी मागणी लोकांकडून होत आहे.