बेळगाव : एकीकडे वेळेत गॅस सिलिंडर मिळविताना ग्रामीण भागातील नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. तर दुसरीकडे वितरकांकडून ग्राहकांची आर्थिक लूट करण्यात येत आहे. यामुळे ग्राहक अडचणीत सापडले आहेत. याबाबत तक्रार करुनही सिलिंडर कंपनीकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे.
सरकारच्या धोरणामुळे घरोघरी गॅस आला आहे. सरकारने वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून गॅस सिलिंडरचा पुरवठा केला आहे. परिणामी ग्रामीण भागातून चुली हद्दपार झाल्या आहेत. शंभर टक्के स्वंयपाक गॅस सिलिंडरवर अवलंबून राहून करावा लागत आहे. याचा गैरफायदा वितरकांकडून घेण्यात येत आहे.
इराण अमेरिका युद्धाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात 45 दिवसांतून एक गॅस सिलिंडरचा पुरवठा करण्यात येत आहे. हे मिळवितानाही कसरत करावी लागत आहे. ग्रामीण भागात एकत्रित कुटुंबे अधिक प्रमाणात असतात. अशा कुटुंबांना किमान महिन्याला एक गॅस सिलिंडर आवश्यक असतो. मात्र, सरकारच्या धोरणामुळे ग्राहकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. परिणामी अनेक ठिकाणी पुन्हा चुलीचा आसरा घ्यावा लागत आहे.
आर्थिक लूट
गॅस वितरकांकडून घरोघरी गॅसपुरवठा करण्यात येतो. मात्र, ग्रामीण भागात ग्राहकांची आर्थिक फसवणूक करण्यात येत आहे. सिलिंडर पुरवठा करणारे कर्मचारी ग्राहकांकडून 50 ते 80 रुपये अधिक उकळत आहेत. याबाबत विचारणा करणाऱ्या ग्राहकांना उद्धट उत्तरे देण्यात येतात. अनेक गावातून एकाच ठिकाणी थांबून गॅसचा पुरवठा करण्यात येतो. याचा फटका वृद्ध व आजारी ग्राहकांना बसतो. सिलिंडर वाहून आणण्यासाठी कसरत करावी लागते.
कारवाईबाबत टाळाटाळ
अशा गैरप्रकाराबाबत मुख््य वितरकांकडे तक्रार केल्यानंतरही कोणतीही कारवाई करण्यात येत नाही. अनेकदा तक्रार करणाऱ्या ग्राहकांचे फोन गॅस वितरकांकडून उचलण्यात येत नाही. तक्रार केल्यास थातुरमातुर उत्तरे देण्यात येतात. यामुळे ग्रामीण भागातील ग्राहक हैराण झाले आहेत.