बेळगाव : पाचजणांना अटक करुन त्यांच्याकडून १ लाख २० हजार रुपये किंमतीचा २.३३४ किलो गांजा पोलिसांनी जप्त केला. या सर्वांकडून ७ लाखाची कार, दुचाकी पाच मोबाईल व ४६ हजार रुपयांची रोकड असा तब्बल ९ लाख २१ हजाराचा मुद्देमाल जप्त केला. सीसीबी पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी ही कारवाई केली. या प्रकरणी मंगळवारी (दि. २) बेळगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.
अटक केलेल्या संशयितांमध्ये कृष्णा ऊर्फ राजू अशोक रामण्णावर (वय २७, रा. गणपती गल्ली, नावगे), प्रमोद सहदेव पाटील (वय ३४, रा. पाटील गल्ली, रणकुंडये), रामकृष्ण निवृत्ती माहुरकर (वय ३२, रा. चंदगड, जि. कोल्हापूर), परशुराम कल्लाप्पा बुगडीकट्टी ((वय २५, रा, मच्छे) व जानू विठ्ठल गावडे (वय ४५, रा. कुंभार्डा, ता. खानापूर) यांचा समावेश आहे.
कृष्णा ऊर्फ हा महाराष्ट्रातील पंढरपूर व त्या भागातून गांजा आणून येथील पेडलरना पुरवठा करत होता. येथील पेडलर बेळगाव शहरासह खानापूर व जोयडासह अन्य तालुक्यांमध्ये गांजा नेऊन विकत होते. दोन दिवसांपूर्वी कृष्णा हा कारमधून शिनोळीमार्गे बेळगावला गांजा घेऊन येत असल्याची माहिती सीसीबीचे निरीक्षक मंजुनाथ नायक यांना मिळाली. त्यांनी सापळा रचून सहकाऱ्यांसह पाच जणांच्या टोळीला पकडले. या सर्वांवर गुन्हा दाखल करुन त्यांच्याकडून गांजा, उपरोक्त साहित्य व रोख रक्कम जप्त केली आहे. या सर्वांवर वडगाव पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे.