बेळगाव : सार्वजनिक ठिकाणी गांजाची बेकायदेशीर विक्री करणार्या दोघांना सीईएन पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून दोन हजार रुपये किंमतीचा 200 ग्रॅम गांजा जप्त केला. कॅम्पमधील शौर्य सर्कलजवळ ही कारवाई करण्यात आली. किरण गुंडू आडाव (वय 21, रा. नवीन गल्ली, आंबेवाडी) व राहुल (रा. शिनोळी) अशी त्यांची नावे आहेत.
शौर्य सर्कलजवळ दोघेजण गांजा विकत असल्याची माहिती सीईएन पोलिसांना मिळाली. एसीपी जे. रघु यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी छापा टाकून या दोघांना अटक केली. त्यांच्याविरोधात एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.