बेळगाव : गणेशोत्सव काळात बकरी चोरुन उंदरी करणाऱ्या त्रिकुटाला पोलिसांनी दसऱ्याच्या तोंडावर 'बकरा' बनवला. त्यांना अटक करुन रोख रक्कम व चोरीसाठी वापरलेली दोन लाख रुपये किंमतीची कार जप्त केली. टिळकवाडी पोलिसांच्या या कार्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कौतुक केले आहे.
अश्पाक खाजासाब साटी (वय ४२), महंमदउबेद फय्याज डोणे (वय १९, दोघेही रा. टेंगिनकेरा गल्ली) व महंमदकैफ आयुबखान मसरगुप्पी (वय २०, रा. बुखारी गल्ली) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.
यातील मुख्य संशयित अश्पाक याचे मटण विक्रीचे दुकान आहे. उंदरीच्या काळात बकरी जादा बकऱ्यांची आवश्यकता असते. शिवाय यावेळी मटणाला मागणीही अधिक असते. जादा नफा मिळवण्याच्या हेतूने अश्पाकने बकरी चोरण्याचा प्लॅन महंमदउबेद व महंमदकैफ यांच्यासमोर मांडला. महंमदउबेद हा चिकन व्यापारी असून या तिघांनी मिळून कारचा वापर करत बेळगाव शहर व तालुका परिसरातील बकरी लक्ष्य केली. तिघांनी तब्बल १० बकरी चोरुन उंदरीच्या काळात विकली. यामध्ये आलेला बहुतांश नफा अश्पाकने ठेवून घेत दोघांना प्रत्येकी २० हजार रुपये दिले.
भाग्यनगरमधील दहा बकरी चोरीला गेल्याची नोंद टिळकवाडी पोलिसांत झाली होती. शिवाय शहर परिसरातील अन्य ठिकाणीही बकरी चोरीला गेल्याचा संशय पोलिसांना होता. त्यामुळे टिळकवाडीचे निरीक्षक परशुराम पुजेरी यांनी याचा तपास हाती घेतला असता उपरोक्त तिघेजण सापडले.
पोलिस आयुक्त प्रकाश निकम, कायदा व सुव्यवस्था शाखेचे डीसीपी एन. व्ही. बरमणी, वाहतूक व गुन्हे शाखेचे डीसीपी निरंजनराजे अर्स, खडेबाजारचे एसीपी शेखराप्पा एच. यांच्या मार्गदर्शनाखाली परशुराम पुजेरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी याचा शोध घेतला. त्यांना उपनिरीक्षक विश्वनाथ घंटामठ, उपनिरीक्षक अडिव्याप्पा कुंडेद, महेश पाटील, एस. एम. करलिंगन्नवर, लाडजीसाब मुल्तानी, नागेंद्र तळवार, परमानंद पवार, गंगा पार्वती, तांत्रिक विभागाचे रमेश अक्की, महादेव काशीद यांचे सहकार्य लाभले.