बेळगाव : ‘गणपती बाप्पा मोरया...’ च्या जयघोषाने निनादणारा परिसर, ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी, पारंपरिक वेशभूषा, आसमंतात घुमणारी भक्तिगीते... अशा वातावरणात सोमवारी (दि. १४) बेळगाव शहर उपनगरांसह संपूर्ण जिल्हा श्रींच्या आगमनाने भक्तिरसात न्हाऊन निघाला. सकाळी नऊपासूनच मूर्तिशाळांत, घराघरांत आणि सार्वजनिक मंडपांत सुरू झालेली लगबग यामुळे आसमंतात नवचैतन्य पसरले होते. घराघरांतून उमटणाऱ्या आरतीच्या सुरांचा हा आनंदसोहळा आता बारा दिवस नवचैतन्य निर्माण करणार आहे.
शहर उपनगरातील गणेशभक्तांनी घरगुती श्रीमूर्ती आणण्यासाठी सकाळी १० ते दुपारी चारपर्यंतचा मुहूर्त साधला. कुणी डोक्यावरून, हातगाडीवरून, कुणी दुचाकीवरून तर कुणी रिक्षा, कार, जीप तर कुणी ट्रॅक्टर ट्रॉलीतून श्रीमूर्ती घरी नेल्या. दुपारी एकपर्यंत मूर्तिशाळांमध्ये गर्दी झाली होती. शहरातील विविध गल्ल्यांमध्ये बाप्पांचा जयजयकार करत वाजत-गाजत श्रीमूर्ती नेल्या जात होत्या. गणेशमूर्ती नेताना कुटुंबीयांसोबत हलगी आणि बँडचा निनाद होत होता.
शहापूर, टिळकवाडी, अनगोळ, वडगाव, खासबाग या उपनगरांतही बाप्पांचे स्वागत भक्तिभावाने करण्यात आले. उपनगरात दुपारी तीनपर्यंत श्रीमूर्ती घरी आणण्याची लगबग होती. घरोघरी गोड नैवेद्य अर्पण करून 'श्रीं'ची मनोभावे पूजा करण्यात आली. घराघरांतून उमटणारे आरतीचे सूर लक्ष वेधून घेत होते. काही कुटुंबात गणरायाच्या आगमनानिमित्त सत्यनारायणाची पूजा मांडण्यात आली होती. आपल्या घरातील बाप्पासमवेत काढलेले फोटो सोशल मीडियावर शेअर करण्याचाही आनंद गणेशभक्तांनी घेतला.
श्रीमूर्ती नेणाऱ्या भक्तांमुळे रस्ते गजबजले होते. शहरासह उपनगरात बालचमूंचा उत्साह शिगेला पोहोचला होता. ग्रामीण भागातील गणेशभक्तांनी शहरातील मूर्तिशाळेत ट्रॅक्टरमधून एकत्रित येत गणेशमूर्ती नेल्या. श्रींच्या आगमनाची आतुरता असलेल्या गणेशभक्तांच्या उत्साहाला उधाण आले होते. पारंपरिक वेशभूषा, टोप्या परिधान केलेले गणेशभक्त आकर्षण ठरले होते. दुपारनंतर गणेश मंदिरात गणेश भक्तांनी दर्शनाचा लाभ घेतला. गणेश मंदिरात अभिषेक, पूजा, महाआरती, भजन आदी कार्यक्रम झाले.
हरतालिका व्रत भक्तिभावाने
शहर परिसरात गणेश चतुर्थीदिवशी हरतालिका व्रत भक्तिभावाने करण्यात आले. यंदा गणेश चतुर्थीदिवशीच आणि सोमवारी हरतालिकाचा विशेष योग जुळून आला. बाजारपेठेत हरतालिका व्रतासाठी प्रतिमा दाखल झाल्या होत्या. चौरंगावर पिवळे वस्त्र मांडून प्रतिमेसह कलशाची पूजा करण्यात आली. सुवासिनी महिला अखंड सौभाग्यासाठी हे व्रत करतात. विवाहेच्छुक तरुणी अनुरूप जोडीदार मिळावा, यासाठी पूजा करतात. यावेळी महिलांनी मातीचे शिवलिंग करून पत्री व बेल अर्पण केले.
सार्वजनिक श्रीमूर्ती रात्री उशिरा मंडपात
सार्वजनिक मंडळांच्या श्रीमूर्तीचा आगमन सोहळा दुपारनंतर सुरू होता. रात्री उशिरापर्यंत मंडळांनी श्रीमूर्ती मंडपात नेल्या. उपनगरात पारंपरिक वाद्यांच्या गजरात सार्वजनिक श्रीमूर्ती मंडपात नेण्यात आल्या. काही मंडळांनी दहापर्यंत तर काहींनी रात्री उशिरापर्यंत गणरायाची प्रतिष्ठापना केली. 'श्रीं'च्या आगमन मिरवणुकीत महिलांचा सहभागही लक्षवेधी होता. सायंकाळी श्रीमूर्ती मंडपात दाखल झाल्यानंतर धार्मिक विधींची धामधूम सुरू झाली.