Belgaum Police 
बेळगाव

Belgaum Police : गणेशोत्सवासाठी कडेकोट बंदोबस्त

पोलिस आयुक्त प्रकाश निकम; शहरावर १,२६० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांतून नजर

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : यंदा शहरात तब्बल १,१५६ गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना होणार असून त्यात २१ नवीन गणेशमूर्तींचा समावेश आहे. गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिस आयुक्तालयाने कडेकोट बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिसबळ तैनात करण्यात आले आहे. शहरातील संवेदनशील भागांवर सीसीटीव्ही व प्रत्यक्ष पोलिसांकडून करडी नजर ठेवण्यात येणार आहे. गणेशोत्सवाच्या तयारीसंदर्भात पोलिस कवायत मैदानावर रविवारी (दि. १३) आयोजित पत्रकार परिषदेत पोलिस आयुक्त प्रकाश निकम यांनी ही माहिती दिली.

ते म्हणाले, गणेशमूर्तींच्या आगमन सोहळ्याला ४ सप्टेंबरपासून सुरुवात झाली आहे. आतापर्यंत सुमारे ७५ गणेशमूर्तींचे शहरात आगमन झाले आहे. गणेशोत्सवासाठी दोन टप्प्यांत बंदोबस्त तैनात केला जाणार असून पहिल्या टप्प्यातील बंदोबस्त १३ सप्टेंबरपासून सुरू झाला आहे. विसर्जन मिरवणुका पूर्ण होईपर्यंत हा बंदोबस्त कायम राहणार आहे. शहरात तीन उपायुक्त उपायुक्त, ६ एसीपी, २३ निरीक्षक, ४४ उपनिरीक्षक, १५५ एएसआय, ४०० कॉन्स्टेबल आणि ४०० होमगार्ड असे सुमारे १,३०० पोलिस कर्मचारी २४ तास कर्तव्यावर राहणार आहेत.

याशिवाय आरएफचे केंद्रीय दलही दाखल झाले असून सीएआर-१०, केएसआरपी-१० आणि सुमारे १५० अधिकारी व कर्मचारी शहरातील संवेदनशील ठिकाणी गस्त घालत आहेत. बंदोबस्तासाठी ३२ सेक्टर बनविले असून १२० फिक्स पॉइंट निश्चित केले आहेत. प्रत्येक गणेश मंडपात तीन शिफ्टमध्ये किमान दोन पोलिस कर्मचारी २४ तास तैनात राहणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

शहरातील संवेदनशील आणि अतिसंवेदनशील भागांमध्ये तब्बल १,२६० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या माध्यमातून पोलिसांकडून २४ तास परिस्थितीवर लक्ष ठेवले जाणार आहे. शहराबाहेरील भागात १९ तपासणी नाके उभारले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून २४ राऊडी व समाजकंटकांना इतर जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. एकाविरुद्ध गुंडा तर एका व्यक्तीविरुद्ध कोका कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.

यंदा अनंत चतुर्दशी बाराव्या दिवशी येत असल्याने गणेशमूर्तींच्या विसर्जन मिरवणुकांना २५ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. शहरात प्रमुख सहा ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे. गणेशोत्सवाच्या आगमन आणि विसर्जनाच्या काळात मद्यविक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. गणेश मंडळांनी शासन तसेच उच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करून उत्सव शांततेत व शिस्तीत साजरा करावा. पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस आयुक्त निकम यांनी केले. यावेळी पोलिस उपायुक्त नारायण बरमनी यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT