देखावे पाहण्यासाठी गणेश भक्तांची गर्दी 
बेळगाव

Belgaum : देखावे पाहण्यासाठी गणेश भक्तांची गर्दी

पावसाची तमा न बाळगता उशिरापर्यंत रस्ते फुलले; आज शेवटचा दिवस

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या येथील गणेशोत्सवात भव्य ‘श्री’मूर्ती व आकर्षक देखावे पाहण्यासाठी गणेश भक्तांच्या गर्दीने रस्ते फुलले. गुरुवारी रात्री शहर, उपनगरांत देखावे पाहण्यासाठी तोबा गर्दी झाली होती. यादरम्यान महाआरतीला भक्तांची लक्षणीय उपस्थिती होती. शुक्रवारी (दि. 5) अखेरचा दिवस असल्याने शहर व उपनगरांत मोठी गर्दी होणार आहे.

शहर व उपनगरांमध्ये सायंकाळी सातनंतर कुटुंबासह सर्व सदस्य सार्वजनिक गणेश मंडळाच्या मूर्ती पाहण्यासाठी गर्दी करत आहेत. एसपीएम रोड येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे सादर केलेला शिवतांडव देखावा पाहण्यासाठी भक्तांची गर्दी होत आहे. समर्थनगर येथील एकदंत युवक मंडळाने ‘कोल्हाट्याचा खेळ’ हा देखावा सादर केला आहे. गोवावेस अनगोळ येथील अनेक मंडळांनी आकर्षक देखावे सादर केले आहेत. शहापूर बँक ऑफ इंडिया कॉर्नर येथील गणेश मंडळातर्फे ‘ऑपरेशन सिंदूर’चा भव्य देखावा सादर केला आहे. शिवाजीनगर येथील विविध मंडळांनी आकर्षक देखावे उभारले आहेत. याशिवाय शहापूर येथेही गणेश भक्तांची दर्शनासाठी गर्दी होत आहे. खडेबाजार, शहापूर तसेच बॅ. नाथ पै सर्कल, वडगाव तसेच अनगोळ येथील विविध मंडळांच्या आकर्षक मूर्ती पाहण्यासाठी लहान मुलांसह आबालवृद्धांची गर्दी झाली होती. श्यामाप्रसाद मुखर्जी रोड येथील मंडळाचा हलता देखावा लक्ष वेधून घेत आहे. अष्टविनायकनगर, वडगाव येथील भव्य गणेशमूर्ती पाहण्यासाठी रात्री उशिरापर्यंत वर्दळ सुरू आहे. विविध मंडळांच्या गणेशमूर्ती तरुणाई आपल्या मोबाईलमध्ये टिपत होती. विविध ठिकाणी मंडळांकडून महाआरती होत आहेत. यावेळी कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थिती लावत आहेत. गुरुवारी दोन दिवस मोठा पाऊस नसला, तरी पावसाची रिमझिम होती, तरीही गणेशभक्त मोठ्या संख्येने गणेश दर्शनासाठी घराबाहेर पडले होते. बेळगाव सीमाभाग तसेच शेजारी असणार्‍या चंदगड, खानापूर, संकेश्वर, बैलहोंगल या परिसरातीलही गणेशभक्त बेळगाव येथे गणेश दर्शनासाठी येत आहेत. परगावाहून आलेल्या भक्तांची सोय म्हणून अनेक मंडळांकडून महाप्रसाद, तर काही मंडळांकडून उपीट, पोहे, शिरा, मसाला भात आदी अल्पोपाहार वाटप करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT