बेळगाव

Belgaum News : पोलिस अधिकार्‍यांचे सोशल मीडिया अकाऊंट हॅक

दिनेश चोरगे

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा :  गेल्या काही दिवसांपासून काहीसे शांत असलेले ऑनलाईन भामटे पुन्हा सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. बंगळूरमधील एका आयपीएस अधिकार्‍याचे तसेच विजापूरमधील एका उपाधीक्षकांचे फेसबुक खाते हॅक करून पैशाची मागणी करण्यासह फर्निचरचे आमिष दाखवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे, या भामट्यांपासून सावध राहण्याचे आवाहन पोलीस खात्याने केले आहे.

विजापूरमधील एका उपाधीक्षकांचे फेसबुक खाते सोमवारी (दि. 2) हॅक करुन त्याद्वारे भामट्याने आधी हाय असा संदेश पाठवला. यानंतर समोरच्या व्यक्तीकडून त्याचा मोबाईल क्रमांक मागून घेतला. आपला एक मित्र सीआरपीएफमध्ये असून त्याची बदली जम्मूला झाली आहे. त्यामुळे, त्यांच्याकडे असलेले साहित्य कमी किमतीत विकायचे आहे. ते तुमच्याशी संपर्क साधतील, असे समोरच्या व्यक्तीला सांगितले. यानंतर संबंधित व्यक्तीने आपल्या व्हॉटस्अ‍ॅप क्रमांकावरून संदेश पाठवला. शिवाय, त्याला दिलेला मोबाईल क्रमांक दुसर्‍या भामट्याला दिला.

आधीच ठरल्यानुसार या भामट्याने आपण संतोषकुमार असून सीआरपीएफमध्ये अधिकारी असल्याचे सांगितले. आपली बदली झाल्याने साहित्य कमी किंमतीत विकायचे आहे, असे सांगत 55 इंची टीव्हीसह किंमती फर्निचरची छायाचित्रे पाठवली. हे सर्व साहित्य फक्त 75 हजार रुपयांना विकायचे असून ते बंगळूरमधील यलहंकामध्ये असल्याचे त्याने सांगितले.

इतके सर्व साहित्य फक्त 75 हजारांना कसे काय, असा संशय आल्याने संबंधित व्यक्तीने आधी खाते हॅक करणार्‍याला फोन करुन विचारण्याचा प्रयत्न केला; पण त्या भामट्याने बिझी असल्याचे सांगत फोन घेतला नाही. इतक्या सर्व साहित्याची कमी किंमत व संबंधित व्यक्ती फोन घेत नसल्याचे लक्षात आल्यानंतर सदरचा क्रमांक ब्लॉक केला.

या घटनेला बारा तास उलटले नाहीत तोवर बंगळूरमधीलच एका वरिष्ठ आयपीएस अधिकार्‍याचे फेसबुक खातेही भामट्यांनी हॅक केले. मंगळवारी (दि. 3) सकाळी मेसेंजरवरुन संदेश पाठवत समोरच्या व्यक्तीकडे क्रमांक मागितला. आपल्याकडे माझा मोबाईल क्रमांक असताना पुन्हा का मागता आहात, असा उलट प्रश्न करताच संबंधित भामट्याने सॉरी म्हणून संदेश पाठवणे बंद केले.
दोन्ही घटना पाहता भामट्यांनी पुन्हा सोशल मीडिया हॅक करत फसवणुकीस सुरुवात केल्याचे दिसून येते.

खातरजमा करण्याचे आवाहन

वरील प्रकरणांवरुन भामट्यांनी आता वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांचे खातेच हॅक करण्यास सुरवात केली आहे. सर्वसामान्य नागरिकांची सोशल मीडिया खाती कधीही हॅक होऊ शकतात. त्यामुळे, कुणीही व्यवहार करताना मेसेज करणार्‍याशी संपर्क साधून खातरजमा करुन घ्यावी. अन्यथा मोठा आर्थिक फटका बसण्याचीच शक्यता अधिक आहे. अशा घटना संबंधित पोलिस ठाण्याला कळवाव्यात, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT