बेळगाव : बेळगावच्या गणेशोत्सवाचा लौकिक देशभरात असून यंदाही हा सण सौहार्दपूर्ण वातावरणात साजरा करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. यंदा गणेश मंडपांना वीजपुरवठा मोफत करण्यात येईल. त्यासाठी प्रशासनाकडून दहा लाखांची तरतूद करण्यात येणार असल्याची महत्त्वाची घोषणा जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी केली. त्याचबरोबर यंदा नव्या मंडळांना परवानगी न देण्याचा निर्णयही जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे शहरातील मंडळांची संख्या सुमारे चारशेच राहणार आहे. तथापि, मोफत विजेसह शहरातील खड्डे, स्वच्छता आणि तलावांची समस्या सोडवावी, अशी मागणी मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळाने प्रशासनाकडे केली आहे.
जिल्हा प्रशासन आणि महापालिकेतर्फे गुरुवारी कुमार गंधर्व रंगमंदिरात गणेशोत्सवासाठी पूर्वतयारी बैठक झाली. बैठकीत बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले, गणेशोत्सव काळात शहरातील रस्ते सुस्थितीत ठेवण्यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. शहरातील १०० रस्त्यांवर देखरेख केली जाणार असून पुढील २० दिवसांत एल अँड टीच्या माध्यमातून दुरुस्तीची कामे पूर्ण करण्यात येतील.
गणेशोत्सव महामंडळाच्या मोफत विजेच्या मागणीवर मोठा दिलासा देण्यात आला. गणेश मंडपांसाठी लागणाऱ्या विजेचे संपूर्ण बिल माफ करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतल्याची माहिती जिल्हाधिकारी रोशन यांनी दिली. या वीज बिलाचा ५० टक्के खर्च जिल्हा प्रशासन, तर उर्वरित ५० टक्के खर्च महापालिका करणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
संवेदनशील ठिकाणांची यादी
पोलिस आयुक्त भूषण बोरसे म्हणाले, प्रत्येक ठाण्याच्या हद्दीचा तसेच संवेदनशील ठिकाणांचा आढावा घेतला असून प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर देण्यात आला आहे. गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीचे थेट प्रक्षेपण शिवचरित्र परिसरात स्क्रीनवर दाखवण्यात येणार आहे. यासोबतच या मैदानांमध्ये हॉकिंग झोन तयार करण्याचेही नियोजन आहे, असे सांगितले.
महामंडळाचे उपाध्यक्ष सागर पाटील, विकास कलघटगी, लोकमान्य महामंडळाचे अध्यक्ष विजय जाधव, शहापूर विभाग महामंडळ अध्यक्ष नेताजी जाधव, सुनील जाधव, रमेश सोनटक्की, माजी नगरसेवक राजू बिर्जे, शरद पाटील, श्रीकांत कदम, महादेव पाटील, संतोष कृष्णाचे, नितिन खन्नुकर, महापौर प्रीती कामकर, उपमहापौर हणमंत कोंगाली आदींनी मनोगत व्यक्त केले.