बेळगाव : एका दुग्धोत्पादन कंपनीच्या अकाऊंटंटचा मोबाईल हॅक करून त्या कंपनीच्या एमडींनी व्हॉटस्ॲप संदेश पाठवल्याचे भासवत १ कोटी रुपयांची मागणी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. फक्त अकाऊंटंटच्या सजगतेमुळे ही फसवणूक टळली असून, त्याबाबतचा गुन्हा सीईएन पोलिसांत दाखल झाला आहे.
मी सांगतो त्या खात्यावर १ कोटी रक्कम वर्ग कर, असा चक्क एमडी आदेश देत असल्याचे सांगणारा मेसेज करत रक्कम पाठवण्यास सांगितली; परंतु सदर अकाऊंटंटने सजग राहत मेसेजवर विश्वास न ठेवता थेट एमडींशी संपर्क साधल्याने तब्बल कोटीची रक्कम वाचली. सायबर भामटे फसवण्याचा कोणता फंडा निवडतील याचा नेम नाही. आता हा नवीन फंडा भामट्यांनी अवलंबला असून त्यांच्या अजेंड्यावर आता मोठ्या कंपन्या व त्याचे अधिकारी घेण्यास सुरुवात केली आहे.
फिर्यादी सय्यद अब्दुलसलाम कागजी (रा. राजहंस गल्ली, अनगोळ) यांनी ३१ जुलै रोजी रात्री शहर सीईएन पोलिसांत फिर्याद दिली आहे. ते दुग्ध व्यवसायात नाव असलेल्या विजयकांत डेअरीमध्ये अकाऊंटंट आहेत. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, २९ जुलै रोजी रात्री आठच्या सुमारास अनोळखी संशयितांनी त्यांचा मोबाईल हॅक केला. मोबाईल हॅक झाल्यानंतर त्यांच्या मोबाईलवर विजयकांत डेअरीच्या व्यवस्थापकीय संचालिका दीपा सिदनाळ यांच्या नावाने व्हॉटस्ॲप मेसेज आला; परंतु सय्यद यांच्या मोबाईलमध्ये एमडींचा दुसरा नंबर सेव्ह असल्याने या अनोळखी क्रमांकाकडे दुर्लक्ष केले.
परंतु, भामट्यांनी मोबाईल हॅक केल्याने त्यांचा नंबर जसा सेव्ह होता तशाच प्रकारे दुसरा अनोळखी नंबर सेव्ह करून त्यावरून मेसेज पाठवत होते. या अनोळखी क्रमांकावरून एमडी दीपा सिदनाळ यांच्या तीन बँक खात्यांचा तपशील देऊन त्यावर एक कोटींची रक्कम वर्ग करण्याचा आदेश या व्हॉटस्ॲप मेसेजमध्ये दिला. भामट्यांनी हा सर्व प्रकार सय्यद यांचा मोबाईल हॅक केल्यानंतर २९ जुलैला रात्री ८ ते ३१ जुलै रोजी दुपारी एक या काळात केला होता. निरीक्षक श्रीशैल गाबी पुढील तपास करीत आहेत.