बेळगाव : बारावीला जास्त गुण मिळाल्याचे दाखवणारी खोटी गुणपत्रके जोडून तलाठी पदाची नोकरी मिळवणाऱ्या चौघांना न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. दोन वर्षाचा कारावास व प्रत्येकी १९ हजाराचा दंड न्यायालयाने ठोठावला. सन २०१२ मध्ये घडलेल्या या प्रकरणाचा १४ वर्षांनी निकाल लागला आहे. जेएमएफसी द्वितीय न्यायालयाचे न्यायाधीश गुरूप्रसाद सी. यांनी हा निकाल दिला. शिक्षा झालेले सर्वजण कोलार जिल्ह्यातील असून, त्यांनी बेळगाव जिल्ह्यात तलाठी म्हणून सेवा बजावली होती.
राजू वेंकटेशाप्पा टी. तिम्मय्या (रा. आनेहळ्ळी, ता. मुळबागीलू, जि. कोलार), मोहनकुमार चंद्राप्पा (रा. कुन्नीबंडी, ता. मुळबागीलू), मंजुनाथ बैचप्पा (रा. मुद्देरी, ता. मुळबागीलू) व बालकृष्ण वेंकटप्पा (रा. आनेहळ्ळी) अशी बोगस तलाठ्यांची नावे आहेत.
बेळगाव जिल्हा महसूल विभागात रिक्त असलेल्या तलाठ्यांच्या जागा भरण्यासाठी सप्टेंबर २०१२ मध्ये अर्ज मागवण्यात आले होते. उपरोक्त चौघांनीही नोकरीसाठी अर्ज केले होते. त्यांचे बारावीचे गुण पाहून गुणवत्ता यादीनुसार या चौघांची तलाठी म्हणून बैलहोंगल व खानापूर तालुक्यात नियुक्ती केली होती. राजू याची नेगीनहाळ (ता. बैलहोंगल), मोहनकुमार याची गोवनकोप्प (ता. बैलहोंगल) मंजुनाथ याची कक्केरी (ता. खानापूर) व बैचप्पा याची गोधोळी (ता. खानापूर) येथे नियुक्ती झाली होती.
नियुक्तीनंतर कागदपत्रांची छानणी सुरू होती. यावेळी उपरोक्त चौघांनी बंगळूर येथील एकाकडून बारावीच्या बनावट गुणपत्रिका तयार करून त्यामध्ये गुण वाढवून घेतले होते. ही बाब तत्कालीन जिल्हाधिकारी एन. जयराम यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी उपरोक्त चौघांविरोधात मार्केट पोलिसांत फिर्याद दिली होती. त्यानुसार ४२०, ४६५, ४६८, ४७१ व ४६६ अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता.
शनिवारी या प्रकरणाचा निकाल लागला. उपरोक्त चौघांनी जोडलेली गुणपत्रके बनावट असल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांनी शासनाची फसवणूक व विश्वासघात केल्याचा ठपका ठेवत न्यायाधीश गुरूप्रसाद यांनी या चौघांना दोन वर्षाचा कारावास व प्रत्येकी १९ हजार यानुसार ७६ हजार रूपयांचा दंड ठोठावला. सरकारी वकील म्हणून ॲड. महांतेश चळकोप्प यांनी काम पाहिले.