विनय कुलकर्णी बुधवारी सायंकाळी अश्रू ढाळत घरातून बाहेर पडले. Pudhari
बेळगाव

Yogesh Gowda Murder Case : माजी मंत्री कुलकर्णी यांची तुरुंगवापसी

योगीश गौडा हत्या : जामीन सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द

पुढारी वृत्तसेवा

­­­­­­धारवाड, बंगळूर : भाजप नेते योगीश गौडा यांच्या हत्या प्रकरणात उच्च न्यायालयाने माजी मंत्री आणि धारवाडचे काँग्रेस आमदार विनय कुलकर्णी यांना दिलेला जामीन सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी रद्द केला. तसेच त्यांना दोन आठवड्यांच्या आत शरण येण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे कुलकर्णी यांना पुन्हा तुरुंगात जावे लागणार आहे. याआधी कुलकर्णी या खूनप्रकरणी काही काळ हिंडलगा कारागृहात होते.

योगीश गौडा हत्या प्रकरणात एप्रिलमध्ये लोकप्रतिनिधी न्यायालयाने कुलकर्णी यांना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. या निर्णयाला कुलकर्णी यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. जून महिन्यात उच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला होता. त्यानंतर कुलकर्णी यांची कारागृहातून सुटका झाली होती.

उच्च न्यायालयाच्या जामीन आदेशाला आव्हान देत सीबीआय आणि योगीश गौडा यांचे बंधू गुरुनाथ यांनी सर्वोच्च न्यायालयात अपील केले होते. अपीलाची सुनावणी करताना न्यायमूर्ती प्रशांतकुमार मिश्रा व न्यायमूर्ती चंद्रशेखर यांच्या खंडपीठाने उच्च न्यायालयाचा आदेश रद्द केला. तसेच १४ दिवसांच्या आत शरण येण्याचे निर्देश दिले. न्यायालयाने सध्या दोन ओळींचा आदेश जारी केला असून सविस्तर निकालाची प्रत सायंकाळपर्यंत दिलेली नव्हती.

अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एस. व्ही. राजू यांनी सीबीआयच्या वतीने युक्तिवाद केला. गंभीर गुन्ह्यांमध्ये शिक्षा स्थगित करताना, सर्वोच्च न्यायालयाचे पूर्वीचे निकाल आणि कायदेशीर तत्त्वे पाळली पाहिजेत. त्यामुळे विनय कुलकर्णी यांची शिक्षा स्थगित करणे आणि त्यांना जामीन मंजूर करणे योग्य नाही. सत्र न्यायालयाने १५ एप्रिल २०२६ रोजी विनय कुलकर्णी आणि १६ जणांना खून प्रकरणात दोषी ठरवले. १७ एप्रिलरोजी विनय कुलकर्णी यांच्यासह इतर १६ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. आणखी एक आरोपी पोलिस अधिकारी चन्नकेशव टिंगारिकर याला सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झालेली आहे.

योगेश गौडा हत्याकांड!

योगेश गौडा यांची हत्या : १५ जून २०१६

२०१९ : सरकारने हे प्रकरण सीबीआयकडे सोपवले

५ नोव्हेंबर २०२० : विनय कुलकर्णी यांना अटक

ऑगस्ट २०२१ : सर्वोच्च न्यायालयाकडून सशर्त जामीन.

मे २०२३ : धारवाड विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले

जून २०२५ : सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा जामीन रद्द केला

१५ एप्रिल २०२६ : लोकप्रतिनिधी न्यायालयाने १६ जणांना दोषी ठरवले

बंगळूर लोकप्रतिनिधी विशेष न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली

मे २०२६ : विधानसभेच्या अध्यक्षांनी बडतर्फ केले

३१ जुलै २०२६ : उच्च न्यायालयाने शिक्षेला स्थगिती दिली

ऑगस्ट २०२६ : उच्च न्यायालयाच्या स्थगिती आदेशाला आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात अपील केले.

विनय कुलकर्णी रडत घरातून बाहेर

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने विनय कुलकर्णी आणि त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला असून, कुलकर्णी बुधवारी सायंकाळी अश्रू ढाळत घरातून बाहेर पडले. ते बंगळूरकडे रवाना झाले आहेत. त्यांच्या चाहत्यांनी त्यांना मिठी मारून अश्रू ढाळले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT