बेळगाव

Belgaum News : उड्डाणपूल माती परीक्षणाच्या कामगारांना अखेर निवारा

सरदार्स मैदानावरील मनपाच्या इमारतीत सोय; नगरसेवक शंकर पाटील यांचा पुढाकार

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : नियोजित उड्डाणपूल उभारणीसाठी माती परीक्षणाचे काम करणाऱ्या कामगारांना अखेर नगरसेवक शंकर पाटील यांनी पुढाकार घेऊन त्यांच्या राहण्याची सोय केली. दैनिक 'पुढारी'ने कामगारांच्या समस्यांवर सविस्तर वृत्तांत प्रसिद्ध केल्यानंतर आमदार राजू सेट आणि नगरसेवक पाटील यांनी कामगारांच्या निवासाची व्यवस्था करण्याची ग्वाही दिली होती. त्यानुसार पाटील यांनी सरदार्स मैदानावरील मनपा इमारतीत कामगारांना राहण्याची सोय करून दिली.

सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे राष्ट्रीय महामार्ग ते धर्मवीर संभाजी महाराज चौकापर्यंत उड्डाणपुलाची उभारणी करण्यात येणार आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात २७० कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली आहे. इतक्या मोठ्या प्रकल्पाचा दीड वर्षापासून गवगवा होत आहे. याच उड्डाणपुलासाठी माती परीक्षण आणि जमिनीची वजन वहन क्षमता तपासण्यात येत आहे.

तथापि, ही वजन वहन क्षमता तपासणाऱ्या तीन कामगारांना फुटपाथवर राहावे लागत होते. भर पावसातही तंबू ठोकून ते पोलिस आयुक्तालयाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या प्रवेशद्वारावरच राहत होते. त्याकडे जिल्हा प्रशासनाचेही दुर्लक्ष झाले होते.

उड्डाणपूल कामगारांच्या त्रासावर दै. 'पुढारी'ने बुधवारी (दि. १२) सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत आमदार राजू सेठ आणि नगरसेवक शंकर पाटील यांनी आपण त्यांच्या राहण्याची सोय करू, अशी ग्वाही दिली होती. त्यानुसार गुरुवारी पाटील यांनी कामगारांची सरदार्स मैदानातील महापालिकेच्या इमारतीत राहण्याची सोय केली. तिथे राहण्यासाठी पुरेशी जागा, झोपण्यासाठी गाद्या, शौचालय या सुविधा उपलब्ध आहेत. त्याबद्दल कामगारांनी दै. 'पुढारी' आणि नगरसेवक पाटील यांचे आभार मानले आहेत.

'पुढारी'ने कामगारांच्या समस्येवर प्रकाशझोत टाकला. शहराच्या विकासासाठी काम करणारे कामगार फुटपाथवर झोपत असल्यामुळे त्यांच्या राहण्याची सोय मनपाच्या मालकीच्या इमारतीत केली.
- शंकर पाटील, नगरसेवक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT