अथणी (बेळगाव) : बाराव्या शतकातील थोर समाजसुधारक महात्मा बसवेश्वर यांच्याबद्दल कथित अवमानकारक वक्तव्य करणारे लेखक रवी हंज यांच्या हत्येसाठी पाच लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केल्याने कर्नाटकात मोठी खळबळ उडाली आहे. लिंगायत नेते प्रकाश महाजन यांनी शनिवारी (दि. २१) बेळगाव जिल्ह्यातील अथणी येथे आयोजित निषेध सभेत हे अत्यंत वादग्रस्त आणि चिथावणीखोर विधान केले.
लेखक रवी हंज यांनी एका मुलाखतीत महात्मा बसवेश्वर आणि बसव तत्त्वज्ञानाविरोधात आक्षेपार्ह भाषा वापरली होती. तसेच, त्यांच्या ‘बसव मंटप’ या पुस्तकामुळे लिंगायत समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याने राज्यभरात तीव्र आंदोलने सुरू झाली आहेत. या निषेधार्थ मोटगी मठाचे मठाधीश प्रभू चन्नबसवा स्वामी यांनी अथणी येथे सभा बोलावली होती.
भरसभेत हत्येची सुपारी, मोबाईल क्रमांक जाहीर
या सभेला संबोधित करताना प्रकाश महाजन यांनी हंज यांच्या हत्येचे उघड आवाहन केले. रवी हंज यांची हत्या झाली पाहिजे. जो कोणी त्यांना ठार करेल, त्याला मी पाच लाख रुपये बक्षीस देईन. इच्छुकांनी माझा मोबाईल क्रमांक लिहून घ्यावा आणि काम फत्ते झाल्यावर संपर्क साधून पैसे घेऊन जावेत, असे धक्कादायक विधान त्यांनी केले. भाषणाच्या शेवटीही त्यांनी या धमकीचा पुनरुच्चार केला. तसेच, संशोधक एम. एम. कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचा संदर्भ देत तत्कालीन सरकारवरही टीका केली. यावेळी त्यांनी पत्रकार विश्वेश्वर भट यांच्यावरही निशाणा साधला.
मठाधीशांकडून निषेध
महाजन यांच्या या घोषणेनंतर मोटगी मठाचे प्रभू चन्नबसवा स्वामी यांनी तत्काळ हस्तक्षेप करत शिरच्छेद किंवा हत्येच्या आवाहनाचा तीव्र शब्दांत निषेध केला. समाजाने महाजन यांचे विधान गांभीर्याने घेऊ नये, असे आवाहन त्यांनी केले. दरम्यान, या वादग्रस्त प्रकरणाची गंभीर दखल घेत कर्नाटक सरकारने ‘बसव मंटप’ पुस्तक जप्त करण्याचे आदेश दिले असून, लेखक रवी हंज यांना केरळममधील कोची येथून अटक करण्यात आली आहे.
१) अथणी येथील निषेध सभेत लिंगायत नेते प्रकाश महाजन यांची वादग्रस्त घोषणा; चक्क मोबाईल क्रमांकही जाहीर केला.
२) मोटगी मठाचे मठाधीश प्रभू चन्नबसवा स्वामी यांच्याकडून या प्रक्षोभक विधानाचा तत्काळ निषेध; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन.
३) महात्मा बसवेश्वर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य आणि ‘बसव मंटप’ पुस्तकावरून कर्नाटकात तीव्र संताप.
४) कर्नाटक सरकारकडून संबंधित पुस्तकावर बंदीचे आदेश; वादग्रस्त लेखक रवी हंज यांना केरळममधील कोची येथून अटक.