संबरगी : अनंतपूर-अथणी राज्यमार्गावर मलाबादहून बाळीगेरीला दवाखान्यात जात असताना बेवनूर क्रॉसजवळ बस आणि दुचाकी यांच्यात जोरदार धडक होऊन बाप-लेक ठार झाल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. या अपघातात दुसरा मुलगा जखमी आहे. मुंडर्गीहून खिळेगावला जाणारी बस सायंकाळी भरधाव वेगाने जात होती.
बेवनूर क्रॉसजवळ आल्यावर दुचाकीला बसने धडक दिली. त्यात नूर सिराज मुल्ला (वय 46) व त्यांचा मुलगा सोहेल (वय 16, दोघेही रा. मलाबाद, ता. अथणी) हे दोघेजण ठार झाले. तर दुसरा मुलगा शोएब नूर मुल्ला हा गंभीर जखमी झाला असून, त्याला मिरज येथे खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.
मुलांची तब्येत ठीक नसल्याने नूर मुल्ला हे बाळीगेरी येथे दवाखान्याला जात असताना हा अपघात घडला. रात्रीच्या वेळी समोरून येणार्या वाहनांचा प्रकाश डोळ्यांवर पडल्याने बसची दुचाकीला धडक बसल्याचे समजते.
अथणी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक व कर्मचार्यांनी भेट देऊन पाहणी केली. या घटनेची नोंद अथणी पोलिस ठाण्यात झाली आहे. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.