बेळगाव

Belgaum Farmers Protest : शेतकऱ्यांची पदयात्रा पोहोचली तेग्‍गूरला

प्रशासनाशी चर्चा : ठोस निर्णयापर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : उसाला प्रतिटन ५,५०० रुपये दर मिळावा आणि साखरेची किमान एमएसपी प्रतिकिलो ३१ रुपयांवरून ६० रुपये करावी या मागण्यांसाठी सुरू असलेली शेतकऱ्यांची पदयात्रा रविवारी कित्तूरमार्गे धारवाड जिल्ह्यातील तेग्गूरपर्यंत पोहोचली. येथे बेळगाव आणि धारवाड जिल्हाधिकाऱ्यांसह पोलिस अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी भेट घेतली आहे. मात्र, या चर्चेतून मागण्यांबाबत ठोस निर्णय न झाल्याने काही शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान, पदयात्रा हुबळीपर्यंत नेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ऊसदराच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी शेतकरी नेते चुन्नप्पा पुजेरी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे. यापूर्वी हत्तरगी येथे शेतकऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला होता. त्यानंतरही मागण्यांबाबत ठोस निर्णय न झाल्याने शेतकऱ्यांनी पदयात्रेचा मार्ग स्वीकारला. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्यासोबत झालेली चर्चाही निष्फळ ठरल्यानंतर शेतकऱ्यांनी हुबळीकडे कूच करण्याचा निर्णय घेतला.

रविवारी पदयात्रा तेग्गूर येथे पोहोचल्यानंतर जिल्हाधिकारी आणि पोलिस अधिकाऱ्यांनी आंदोलकांशी चर्चा केली. मात्र, ऊसदर आणि साखरेच्या एमएसपीबाबत ठोस निर्णय घेण्याऐवजी चर्चांवरच भर दिला जात असल्याची भावना काही शेतकऱ्यांनी व्यक्त केली. शेतकऱ्यांच्या मागण्यांना बगल देऊन आंदोलन लांबविण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही काही आंदोलकांनी केला.

उसाला प्रतिटन ५,५०० रुपये दर आणि साखरेची एमएसपी प्रतिकिलो ६० रुपये करण्याच्या मागण्यांवर ठोस निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका शेतकरी घेत आहेत. पदयात्रा हुबळीत पोहोचल्यानंतर केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे या आंदोलनातून ऊस उत्पादकांच्या मागण्यांवर तोडगा निघणार का, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

काही शेतकरी नाराज

पदयात्रा हुबळीपर्यंत सुरू ठेवण्याच्या निर्णयावरूनही शेतकऱ्यांमध्ये मतभेद दिसून येत आहेत. काही शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त करत आंदोलनातून माघार घेतल्याचे समजते. त्यामुळे आंदोलनातील एकजूट टिकवून ठेवण्याचे आव्हान शेतकरी नेत्यांसमोर उभे राहिले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT