बेळगाव : बँकखात्याला जोडले गेलेले सिमकार्ड हरवल्यानंतर त्या क्रमांकाचे नवीन सिमकार्ड न घेतल्याने तसेच तोच क्रमांक बँक खात्याशी संलग्न ठेवल्याने एका कुटुंबाला तब्बल पाच लाखांचा फटका बसला आहे. या प्रकरणी अथणी तालुक्यातील शंकरट्टी येथील कुटुंबियाने जिल्हा सीईएन पोलिसांत शुक्रवारी फिर्याद दिली आहे.
ब्रह्मसुरी वंजोळ नामक व्यक्तीचे पत्नीसोबत जॉईंट बँक खाते हारुगेरी येथील आरबीएल बँकेत होते. त्याला लिंक केलेला मोबाईल क्रमांक ब्रह्मसुरी यांच्याकडे होता. बँकेला लिंक केलेले सिमकार्ड दहा-अकरा महिन्यांपूर्वी हरवले. त्यानंतर त्यांनी त्याच मोबाईल क्रमांकाचे नवीन सिमकार्ड घेण्याची गरज होती किंवा बँक खात्याला जोडलेला मोबाईल क्रमांक तरी बदलण्याची गरज होती. परंतु, त्यांनी दोन्ही बाबींकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर त्या क्रमांकाचे सिमकार्ड जेव्हा दुसऱ्या व्यक्तीच्या नावे गेले तेव्हा तो क्रमांक आपोआपच ब्रम्हसुरी यांच्या बँक खात्याला लिंक झाला.
त्यानंतर त्या भामट्याने ब्रम्हसुरी यांच्या बँक खात्यावर असलेली ४ लाख ८९ हजार ९९७ रुपयांची रक्कम टप्प्याटप्प्याने काढून घेतली. हा सर्व प्रकार २७ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर या दरम्यान घडला आहे. ही बाब या कुटुंबियांच्या आता लक्षात आल्याने त्यांनी यासंबंधीची फिर्याद जिल्हा सीईएनकडे केली आहे. पोलिसांनी याची नोंद करून घेतली असून, निरीक्षक सुनीलकुमार नंदिश्वर पुढील तपास करीत आहेत.
संशयित मिळणार पण...
सदर कुटुंबियाने आपले सीमकार्ड हरवल्यानंतर एक तर ते कंपनीत जाऊन बंद करणे गरजेचे होते किंवा नवीन सिमकार्ड घेणे गरजेचे होते. कार्ड जर बंद केले नाही, तर तो क्रमांक अन्य कोणाला तरी कंपनीकडून दिला जातो. तसा तो क्रमांक ज्याला मिळाला आहे, त्याचा शोध घेणे पोलिसांना शक्य होणार असून, ज्याच्या नावे सिम आहे तो संशयित सापडेलच. परंतु, रक्कम परत मिळेल का, हा प्रश्र्न आहे.