बेळगाव ः पाटील गल्लीतील सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाने साकारलेला छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या भेटीचा देखावा. pudhari photo
बेळगाव

बेळगावकरांनी अनुभवला शिवकाळ

शिवजयंती चित्ररथ मिरवणूक पारंपरिक उत्साहात : सजीव देखाव्यांनी जिंकली मने; पहाटेपर्यंत रस्ते फुलले

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : सजीव देखाव्यांतून सादर केलेले छत्रपती शिवरायांच्या जीवनातील प्रसंग, समाज प्रबोधनात्मक देखावे, मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके, ढोल-ताशांचा गजर आणि शिवरायांचा जयजयकार अशा उत्साही वातावरणात गुरुवारी (दि. 1) रात्री आठ वाजता सुरू झालेली चित्ररथ मिरवणूक पहाटे उशिरापर्यंत सुरू होती.

मराठमोळ्या संस्कृतीचे दर्शन घडवत छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जागविण्यात आला. शिवजन्मोत्सवापासून शिवराज्याभिषेक आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या अंतापर्यंत विविध प्रसंगांचे हालते देखावे सादर केले होते. भारावलेल्या वातावरणात चित्ररथ मिरवणुकीने चैतन्य आणि गर्दीची परंपरा कायम राखली.

नरगुंदकर भावे चौकातून चित्ररथ मिरवणुकीला प्रारंभ झाला. रात्री नऊनंतर मारुती गल्ली, रामदेव गल्ली, समादेवी गल्लीत गर्दी पाहायला मिळाली. चित्ररथ पाहण्यासाठी महिलाही मोठ्या संख्येने घराबाहेर पडल्या होत्या. मिरवणूक मार्गात सादर होणारे शिवचरित्रातील प्रसंग पाहण्यासाठी गर्दी होत होती. यंदा पारंपरिक वाद्यांचा वापर मोठ्या प्रमाणात झाला. अनेक सामाजिक संघटना व सामाजिक कार्यकर्त्यांनी शिवप्रेमींसाठी नाश्ता व चहाची सोय केली होती. त्यामुळे, रात्री उशिरापर्यंत थांबून मिरवणूक पाहणार्‍या शिवप्रेमींची गैरसोय टळली.

भांदूर गल्ली स्वराज्य मित्र मंडळतर्फे शिवरायांची आग्रा भेट, पाटील गल्ली भगतसिंग चौक शिवजयंती उत्सव मंडळातर्फे पन्हाळगडचा वेढा, अनंतशयन गल्लीतील भगवे वादक युवक मंडळातर्फे छत्रपती संभाजी महाराज त्यांच्या जीवनावरील प्रसंग लक्षवेधी ठरला. ताशिलदार गल्लीतील जननी महिला मंडळातर्फे सरसेनापती प्रतापराव गुजर आणि संभाजी महाराजांचा पाळणा, कपिलेश्वर रोड येथील बाल शिवाजी युवक मंडळातर्फे अफजलखान वध आणि शाहिस्तेखानाची फजिती हे देखावेही वैशिष्ट्यपूर्ण ठरले. वज्रनाद, शिवगर्जना, शिवमुद्रा ढोल-ताशा पथक, नरवीर ढोल-ताशा पथक, कॅम्पमधील के. टी. पुजारी लाठीमेळा, गणेशपूर येथील शिवनिश्चय पथकाने मर्दानी खेळ सादर केला. दोन चित्ररथांच्या मधोमध करेला, दांडपट्टा, तलवारबाजीच्या प्रात्यक्षिकांनीही उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फिटले.

प्रेक्षक गॅलरीत आबालवृद्धांची गर्दी

धर्मवीर संभाजी चौकसमोर कॉलेज रोडवर उभारण्यात आलेल्या प्रेक्षक गॅलरीत रात्री अकरानंतर गर्दी होती. चित्ररथ मिरवणूक बसून पाहता यावी, यासाठी महापालिकेतर्फे शिवभक्तांना दरवर्षी प्रेक्षक गॅलरी उभी केली जाते. मिरवणूक पाहण्यासाठी ग्रामीण भागासह परराज्यांतूनही शिवप्रेमी येत असल्याने त्यांची बैठक व्यवस्था करण्यात आली होती. प्रेक्षक गॅलरीत लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि महिलांची गर्दी होती.

मिरवणूक डीजेमुक्तीकडे

यंदाची शिवजयंती चित्ररथ मिरवणूक डीजेमुक्त करण्यासाठी प्रयत्न झाले. मध्यवर्ती शिवजयंती उत्सव महामंडळाने त्यासाठी पुढाकार घेतला होता. त्यांतर्गत मंडळांमध्ये जागृतीही करण्यात आली होती.

दै. ‘पुढारी’नेही ‘जागर डीजेमुक्त शिवजयंतीचा’ या नावाने मालिका चालवून डीजेमुक्त मिरवणुकीसाठी प्रबोधन केले होते. या सर्व प्रयत्नांचा सकारात्मक परिणाम झाल्याचे मिरवणुकीत दिसून आले. काही मंडळांनी डीजेला फाटा देऊन शिवकालीन सजीव देखावे व मर्दानी खेळांच्या सादरीकरणाला प्राधान्य दिले होते. त्यामुळे, मिरवणुकीतील डीजेचा दणदणाट व गोंधळ कमी झाला होता. प्रेक्षकांनाही सजीव देखावे नीटपणे पाहता येत होते. बापट गल्ली, माळी गल्लीतील मंडळांनी एकाच ठिकाणी बराच काळ थांबून देखाव्यांचे सादरीकरण करून नवीन पायंडा पाडला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT