Life Imprisonment Pudhari
बेळगाव

Karnataka Crime : माजी सैनिकाच्या खूनप्रकरणी एकाला जन्मठेप

जिल्हा न्यायालयाचा निकाल; तिघांना दहा वर्षांचा सश्रम कारावास, १.२२ लाखांचा दंड

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : जमिनीच्या वादातून माजी सैनिकाचा खून करुन त्याच्या भावाच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी दहाव्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने एका आरोपीला जन्मठेप तर तिघांना दहा वर्षांचा सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. न्या. आर. पी. गौडा यांनी मंगळवारी (दि. २२) हा निकाल दिला. आरोपींना एकूण एक लाख २२ हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला.

शंकरेप्पा मल्लसर्ज ऊर्फ मल्लाप्पा खनगावी याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. तर शशिधर मल्लसर्ज ऊर्फ मल्लाप्पा खनगावी, मल्लसर्ज ऊर्फ मल्लाप्पा शंकरेप्पा खनगावी आणि मीनाक्षी मल्लसर्ज ऊर्फ मल्लाप्पा खनगावी (सर्व रा. तिगडी, ता. बैलहोंगल) यांना प्रत्येकी दहा वर्षांचा सश्रम कारावास सुनावण्यात आला.

खटल्याची पार्श्वभूमी अशी, जमिनीच्या वाटणीवरुन आरोपी आणि मयत सुरेश खनगावी व जखमी सदाशिव खनगावी यांच्यात वाद सुरु होता. ४ जून २०२३ रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास आरोपी शेतात ट्रॅक्टरने मशागत करीत असताना फिर्यादी कस्तुरेव्वा, त्यांचे पती सदाशिव आणि सुरेश यांनी आरोपींकडे याबाबत विचारणा केली. यावेळी शंकरेप्पा, शशिधर आणि मल्लसर्ज यांनी विळा, कुदळ व फावड्याने सदाशिव आणि सुरेश यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात सुरेश यांचा जागीच मृत्यू झाला. सदाशिव हे गंभीर जखमी झाले. मीनाक्षीने आरोपींना चिथावल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले होते.

याप्रकरणी बैलहोंगल पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२, ३०७, ३२६, १०९, ५०४, ५०६ सह ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन पोलिस निरीक्षक एस. आर. गणचारी आणि पी. व्ही. सालीमठ यांनी तपास करुन न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. न्यायालयासमोर साक्षीदारांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. तसेच कागदपत्रे तपासण्यात आली. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्या. गौडा यांनी आरोपींना शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे ॲड. आर. ए. बारावली यांनी काम पाहिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT