Belgaum News : ‘ती’ दोन मुलांची आई, लग्‍नासाठी 'त्या'ची घाई! AI
बेळगाव

Belgaum News : ‘ती’ दोन मुलांची आई, लग्‍नासाठी 'त्या'ची घाई!

इंजिनिअर तरुणाची लव्हस्टोरी; कापून घेतली नस

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : काही वर्षांपूर्वी तिच्या पतीचे निधन झाले... दोन मुलांची आई असलेल्या या महिलेचे व एका तरुणाचे प्रेम जुळले. परंतु, तो तरुण दारू पिऊन दंगा करतो, संशय घेतो म्हणून ती त्याला टाळत आहे. तरीही तिच्याशीच लग्‍न करायचे असे म्हणत तरुणाने आपल्या हाताची नस कापून घेतली. खडेबाजार पोलिस ठाण्यासमोर घडलेल्या या प्रकरणाची नेमकी लव्ह स्टोरी समोर आली.

मंगळवारी सायंकाळी एका तरुणाने खडेबाजार पोलिस ठाण्यात जाऊन अधिकारी व पोलिसांसमोरच आपल्या हाताची नस कापून घेतली. त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले असून प्रकृती धोक्याबाहेर आहे. परंतु, त्याने नस नेमकी कशासाठी कापून घेतली, याबाबत पोलिसांना समजलेली स्टोरी वेगळीच आहे.

बीई मेकॅनिकल इंजिनिअर असलेला हा तरुण पूर्वी बंगळूरला नोकरी करत होता. बेळगावात आला असता खडे बाजार परिसरात हद्दीत राहणाऱ्या एका विधवा महिलेशी त्याची ओळख झाली. त्यानंतर दोघे प्रेमात पडले. या महिलेला दोन मुले आहेत. तरीही दोघेजण एकत्रित आले होते. परंतु, हळुहळू या तरुणाने आपले अवगुण दाखवण्यास सुरुवात केली. त्याला दारूचे व्यसन लागले, तो सतत दारू पिऊन यायचा व या महिलेला शिवीगाळ करायचा. आपले घर चालवण्यासाठी ती कुठे नोकरी करत असेल तर तिच्यावर तेथील लोकांशी संबंध जोडून संशय घ्यायचा, असा प्रकार सुरू झाल्याने तिने त्याला टाळण्यास सुरुवात केली.

आधी घराजवळ नंतर ठाण्यात

सदर महिला आपल्याला टाळते आहे, हे लक्षात आल्यापासून हा तरुण अस्वस्थ बनला होता. तो सारखा तिचा पिच्छा पुरवत होता. तरीही ती आता तू आपल्या घराकडे येऊ नकोस, असे सांगत होती. मंगळवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास तो या महिलेच्या घरासमोर गेला. आपण लग्‍न करूया, असे सांगत होता. परंतु, ती त्याला जाण्यास सांगत होती. पोलिसांनी त्याला खडेबाजार ठाण्यात आणले. त्यांनाही तो मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, तुम्ही तिला समजावून सांगा, असेच सांगत होता. तर मी जिवंत राहणार नाही, तिच्यासाठी मी खूप खर्च केला आहे, त्याग केला आहे, असे म्हणतच त्याने ठाण्यासमोरच ब्लेडने हातावर वार करून घेतले. तो रक्तबंबाळ झाल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे पोलिसांनी सांगितले.

तरुणाचे पालक हतबल

तरुणाच्या पालकांना बुधवारी खडेबाजार पोलिसांनी बोलावून घेतले होते. मात्र, पालकांचेही तो तरुण ऐकत नाही. सदर महिला ३५ वर्षांची व आपला मुलगा ३१ वर्षांचा आहे. तिच्या मागे लागून त्याने आपले करिअर संपवले आहे. तुम्हीच त्याला जरा समजावून सांगा, अशी विनंती या तरुणाचे पालक पोलिसांना करत होते.

गुन्हा दाखल होणार

तरुणाने स्वतःवर ठाण्यातच हल्ला केल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल होणार आहे. तो पूर्णपणे बरा झाल्यानंतर गुन्ह्याची प्रक्रिया पूर्ण करणार असल्याचे खडेबाजार पोलिसांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT