बेळगाव : राज्यातील ग्राम पंचायतीच्या निवडणुका तीन महिन्यांपर्यंत लांबणीवर पडणार आहेत. त्यामुळे, निवडणुकीची तयारी करणाऱ्या इच्छुकांचा जीव टांगणीला लागला आहे. निवडणुका पावसाळा संपल्यानंतरच जाहीर होण्याची शक्यता आहे. तोपर्यंत इच्छुकांना कसरत करावी लागणार आहे.
ग्राम पंचायतींच्या निवडणुकांना अलीकडच्या काळात नको तितके महत्त्व प्राप्त झाले आहे. विकासकामांसाठी केंद्र सरकारकडून थेट ग्राम पंचायतींना निधी देण्यात येत आहे. त्यामुळे, गावपातळीवर विकासकामे राबविताना ग्राम पंचायतींची भूमिका महत्त्वाची ठरत आहे. ग्राम पंचायतीवरील वर्चस्वासाठी गावागावांतून आतापासून राजकीय चुरस निर्माण झाली आहे. कोणत्याही परिस्थितीवर ग्राम पंचायतींवर निवडून येण्यासाठी अनेकांनी कंबर कसली आहे. अनेक इच्छुक गत सहा महिन्यांपासून कार्यरत झाले आहेत. मतदारांना आकर्षित करण्यासाठी सार्वजनिक कार्यक्रमांतून त्यांचा वावर वाढला आहे. मरणा दारी आणि तोरणा घरी भावी नेत्यांची वर्दळ वाढली आहे. धार्मिक, सार्वजनिक कार्यक्रमांतून गावपातळीवरील नेत्यांचा वावर दिसून येत आहे.
ग्राम पंचायत सभागृहांची मुदत संपल्यानंतर लागलीच ग्राम पंचायतींच्या निवडणुका जाहीर होतील, असा अंदाज वर्तविण्यात येत होता. त्यादृष्टीने इच्छुकांनी तयारी चालविली होती. राजकीय नेत्यांनीही आपल्या कार्यकर्त्यांची सोय ग्राम पंचायतीमध्ये लावण्यासाठी कंबर कसली होती. परंतु, निवडणुका जाहीर होण्यास विलंब होत असल्याने नेत्यांचाही हिरमोड झाला आहे. निवडणुका कधी होतील याबाबत अद्याप निश्चित माहिती नाही. त्यामुळे इच्छुक कार्यकर्त्याना गावातील मतदारांना सांभाळताना खिसा खाली करावा लागत आहे. गावपातळीवरील स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रमांना देणग्या द्याव्या लागत आहे. युवक मंडळांना सांभाळून ठेवावे लागत आहे.