बेळगाव

Karnataka Crime: अंत्यसंस्कारानंतर ४४ दिवसांनी पुन्‍हा शवविच्छेदन

विजापूर जिल्ह्यात कडेकोट पोलिस बंदोबस्त

पुढारी वृत्तसेवा

विजापूर : विजापूर जिल्ह्यातील मुद्देबिहाळ तालुक्यातील नागरबेट्टा येथील दलित कुटुंबातील रवीचंद्र मादर या तरुणाच्या मृतदेहाचे अंत्यसंस्कारानंतर तब्बल ४४ दिवसांनी पुन्‍हा शवविच्छेदन करण्यात आले. बेळगाव येथील केआयएमएस रुग्णालयातील डॉक्टरांच्या पथकाने हे शवविच्छेदन केले असून त्याचा अहवाल सुमारे एका महिन्यात उपलब्ध होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

बसवण बागेवाडी तालुक्यातील हंगरगी गावाजवळील एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या रवीचंद्र मादर यांचा २५ मे रोजी संशयास्पद मृत्यू झाला होता. त्यांची हत्या झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात यापूर्वी विजापूर येथील बीएलडीई रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले होते. पण, पहिल्या शवविच्छेदन अहवालाबाबत संशय व्यक्त करत मृताच्या कुटुंबीयांनी आणि दलित संघटनांनी प्रांताधिकार्‍यांमार्फत न्यायालयात धाव घेत दुसऱ्या रुग्णालयात पुन्‍हा शवविच्छेदन करण्याची मागणी केली होती. मागणीची दखल घेत प्रशासनाने बेळगावच्या केआयएमएस रुग्णालयातील डॉक्टरांच्या पथकाकडे शवविच्छेदनाची जबाबदारी सोपवली. त्यानुसार नागरबेट्टा येथील स्मशानभूमीतून मृतदेह बाहेर काढून कडेकोट पोलिस बंदोबस्तात शवविच्छेदन करण्यात आले.

जिल्हा अत्याचार प्रतिबंधक समितीचे सदस्य मल्लू तळवार, अभिषेक चक्रवर्ती, टिप्पण्णा दोड्डमनी यांनी नि:पक्ष चौकशीची मागणी केली. त्यांनी पहिल्या शवविच्छेदन अहवालाबाबत शंका व्यक्त करत पारदर्शक चौकशीद्वारे पीडित कुटुंबाला न्याय मिळावा, अशी मागणी केली. यावेळी नालतवाड, ताळीकोटे आणि मुद्देबिहाळ पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. यावेळी प्रांताधिकरी गुरुनाथ, केआयएमएस रुग्णालयाचे डॉ. सुनील बिरादार, डॉ. रंगनाथ वैद्य, तहसीलदार कीर्ती चालक, सीपीआय महम्मद फशिवुद्दीन, डीसीआरई सिद्धेश्वर, उपनिरीक्षक ज्योती कोत, संदीप सिंग, नगरपंचायत मुख्याधिकारी प्रशांत सी., ग्रामविकासाधिकारी नारायण, सचिव अय्यप्पा मलगलदिन्‍नी आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT