Job Fraud Pudhari
बेळगाव

Belgaum District Bank Job Fraud : जिल्‍हा बँकेत नोकरीच्‍या आमिषाने लाखोंचे व्‍यवहार

व्‍हिडीओ व्‍हायरल : निपाणीचे ग्रेड टू तहसीलदार श्रीखंडे यांच्‍याविरोधात पोलिसांत तक्रार

पुढारी वृत्तसेवा

निपाणी : निपाणीचे ग्रेड टू तहसीलदार अरुण श्रीखंडे यांनी बेळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष अण्णासाहेब जोल्ले यांचे नाव घेऊन जिल्हा बँकेत नोकरी लावतो म्हणून लाखो रुपयांचे व्‍यवहार चालवले असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याची दखल घेऊन अरुण श्रीखंडे यांच्याविरोधात मंगळवारी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असल्याची माहिती अण्णासाहेब जोल्ले यांनी पत्रकारांना दिली.

अण्णासाहेब जोल्ले म्हणाले, जिल्हा मध्यवर्ती बँकेत नोकर भरती होणार आहे. याबाबतची जाहिरात वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली होती. परंतु शासनाने नवीन नियमावली लागू केल्याने ही भरती सध्या थांबवण्यात आली आहे. शासनाच्या नवीन नियमानुसार ही भरती केली जाणार आहे. यासाठी कोणत्याही एजंटामार्फत इच्छुकांनी प्रयत्न करू नयेत, असे आवाहन यापूर्वीच आपण केले होते. तरीदेखील माझ्या नावाचा वापर करून ग्रेड टू तहसीलदार अरुण श्रीखंडे यांनी पैशाचे व्‍यवहार चालवले असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. पोलिसांनी या व्हिडीओची सत्यता तपासून पाहावी व अरुण श्रीखंडे यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी अशी तक्रार मंगळवारी शहर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

सरकारी हुद्द्यावर राहून नोकरीचे आमिष दाखवणे हा गंभीर विषय आहे याप्रकरणी पैशांचा गैरव्यवहार झाला आहे का, याचीही चौकशी व्हावी तसेच या प्रकरणाची नि:पक्षपातीपणे चौकशी करावी. नित्यानंद हिरेमठ यांनी सोशल मीडियावर व्‍हायरल केलेल्‍या व्हिडीओची सत्यता पासून योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी अण्णासाहेब जोल्‍ले यांनी केली आहे.

भाजप कार्यकर्त्यांची तहसील कार्यालयावर धडक

अण्णासाहेब जोल्ले यांनी मंगळवारी पोलिसांत तक्रार दाखल केल्यावर भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तहसीलदार कार्यालयावर धडक देऊन अरुण श्रीखंडे यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला. परंतु ते रजेवर होते. यावेळी तहसीलदार सुरेश मुंजे यांनी आपण निवेदन द्यावे ते निवेदन आपण वरिष्ठांना पाठवून देऊ. मला कोणतीही कारवाई करता येत नाही, असे स्पष्ट केले.

यावेळी भाजप युवा मोर्चा अध्यक्ष रोहित वैद्य, प्रशांत केसती, अभिनंदन मुदकुडे, बंडा घोरपडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. बुधवारी तहसील कार्यालयाला घेराव घालून श्रीखंड यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली जाणार आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन भाजप युवा मोर्चातर्फे करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT