Digital Arrest Pudhari
बेळगाव

Belgaum Digital Arrest : ‘डिजिटल अरेस्ट’च्या धाकाने पुन्हा फसवणूक

खासबागच्या महिलेला साडेपाच लाखांना लुटले, बेळगावातील चार दिवसांतील दुसरे प्रकरण

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवत ऑनलाईन लुटण्याचे प्रकार पुन्हा वाढले आहेत. तशी भीती दाखवत खासबागमधील एका महिलेच्या बँक खात्यावरून ५ लाख ५४ हजार रुपयांची रक्कम परस्परवर्ग करून घेण्यात आली आहे. या प्रकरणाची बुधवारी (दि. २३) शहर सीईएन पोलिसांत नोंद झाली आहे.

याबाबत सीईएन पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, गायत्रीनगर खासबाग येथे राहणाऱ्या मंगल नामक ५५ वर्षीय वृद्धेला रविवारी (दि.२०) दोन अनोळखी क्रमांकांवरून फोन आला. तुमच्या नावचे सीमकार्ड व एटीएम कार्डचा वापर बेकायदेशीर कारणासाठी होत आहे. त्यामुळे तुम्हाला अटक करावी लागेल.

ही अटक थांबवायची असेल तर आम्ही सांगतो त्या बँक खात्यावर तुम्ही तुमच्या खात्यावर असलेली रक्कम वर्ग करा. तुमची चौकशी संपल्यानंतर पुन्हा ही रक्कम तुमच्या खात्यावर पाठवतो, असे या भामट्यांनी सांगितले. त्यांच्या धमकीला घाबरून या महिलेने आपल्या खात्यातील ५ लाख ५४ हजारांची रक्कम भामट्यांनी सांगितलेल्या बँक खात्यावर आरटीजीएसद्वारे वर्ग केली. आपण फसलो गेल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी बुधवारी शहर सीईएन ठाणे गाठून याबाबतची फिर्याद दिली. फिर्याद दाखल करून घेत पोलिस निरीक्षक श्रीशैल गाबी पुढील तपास करीत आहेत.

सहा दिवसांपूर्वी भामट्यांनी महांतेशनगरमधील एका ६६ वर्षांच्या वृद्धेलाही डिजिटल अरेस्टची भीती दाखवून १६ लाखाला लुटल्याची फिर्याद दाखल झाली आहे. या वृद्धेची महिन्याच्या कालावधीत दोनवेळा रक्कम वर्ग करून घेतली. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून ऑनलाईन फसवणुकीच्या बंद झालेल्या घटनांनी पुन्हा डोके वर काढल्याचे दिसून येत आहे. विशेषतः डिजिटल अरेस्टच्या भीतीने सर्वसामान्यांची आणि पोलिसांचीही डोकेदुखी वाढली आहे.

सॉफ्टवेअर अपडेटद्वारेही फसवणूक

मोबाईलवर येणारा सॉफ्टवेअर अपडेटच्या मेसेजवर क्लीक केल्यानंतर मोबाईल हँग होऊन संबंधिताच्या बँक खात्यावरील ९९ हजारांची रक्कम परस्पर काढून घेतल्याच्या विचित्र ऑनलाईन फसवणुकीची नोंद शहर सीईएनमध्ये झाली आहे.

सांबरा येथे केएमव्ही प्रोजेक्ट नावाची कंपनी आहे. या कंपनीत चेतन बी. आर. नामक अधिकारी तरुण त्यांच्या कार्यालयात बसला होता. १७ ऑगस्ट रोजी दुपारी १.३० च्या सुमारास त्यांच्या मोबाईलवर सॉफ्टवेअर अपडेटचा मेसेज आला त्यांनी बहुदा त्यावर अनावधानाने क्लीक केले असता मोबाईल स्विच ऑफ झाला. यानंतर सुमारे २० मिनिटांनी मोबाईल सुरू झाला तेव्हा त्यांच्या मोबाईलवर एपीके फाईल इन्स्टॉल झाल्याचे दिसून आले. परंतु, मोबाईल स्विच ऑफ झाल्याच्या काळात त्यांच्या कॅनरा बँकेच्या खात्यातून तब्बल ९९ हजारांची रक्कम वर्ग झाल्याचे आढळून आले. आपली सायबर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने त्यांनी बुधवारी या प्रकरणी शहर सीईएन पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिस निरीक्षक श्रीशैल गाबी तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT