बेळगाव : बहुचर्चित बेळगाव-धारवाड रेल्वेमार्गाच्या कामाला अखेर निर्णायक गती मिळाली आहे. जिल्हा प्रशासनाने अवघ्या चार महिन्यांच्या विक्रमी कालावधीत सुमारे 1,200 एकर भूसंपादन पूर्ण केले आहे. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या नेतृत्वाखाली साध्य झालेल्या या महत्त्वपूर्ण कामगिरीमुळे गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या 73 किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पाला चालना मिळाली आहे. डिसेंबर महिन्यात प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.
बेळगाव-धारवाड रेल्वेमार्गात जमीन गमावणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सुमारे 300 कोटी रुपयांचे नुकसानभरपाई पॅकेज मंजूर करण्यात आले आहे. यापैकी 60 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये थेट जमा करण्यात आले असून उर्वरित रक्कम टप्प्याटप्प्याने दिली जाणार आहे. सुरुवातीला या प्रकल्पासाठी सुमारे 1,436 एकर जमिनीची आवश्यकता होती. बेळगाव जिल्ह्यातील बहुतांश भूसंपादन प्रक्रिया आता पूर्ण झाली असली तरी धारवाड जिल्ह्यातील जमिनीचा एक छोटासा भाग अद्याप संपादीत व्हायचा आहे. मात्र हा प्रश्नही लवकरच मार्गी लागण्याची शक्यता आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार भूसंपादन झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाईचे वितरण पूर्ण होताच डिसेंबरपर्यंत या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.
प्रकल्पाच्या सुरुवातीच्या टप्प्यात सुमारे 180 शेतकरी आणि जमीनमालकांकडून विरोध झाला असला तरी प्रशासनाने सातत्यपूर्ण संवाद आणि समुपदेशनाच्या माध्यमातून त्यांच्या शंका व समस्यांचे निराकरण करण्यात यश मिळवले. व्यापक जनहित लक्षात घेऊन जमीनमालकांनी अखेर संमती दर्शवली, असे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. केंद्र आणि राज्य सरकार यांच्यातील 50:50 या खर्चाच्या वाटप सूत्रानुसार मंजूर झालेला हा रेल्वेमार्ग कित्तूरमार्गे धारवाडला जाईल. यामुळे बेळगाव आणि धारवाडमधील प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होईल. प्रादेशिक संपर्क व्यवस्था आणि आर्थिक उलाढालीला मोठी चालना मिळेल.