बेळगाव

MLA Raju Shet: बेळगावच्या विकासासाठी प्रयत्नशील राहणार

आमदार राजू सेट : बुडा अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : राष्ट्रीय नेत्यांसह स्थानिक नेत्यांनी पाठिंबा देऊन आपल्यावर बुडा अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. स्वतःच्या मतदारसंघासह आता संपूर्ण बेळगावच्या विकासाची जबाबदारी माझ्यावर येऊन पडली आहे. हायकमांड व पक्षाने दिलेली जबाबदारी मी व्यवस्थित पार पाडून बेळगावच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहणार आहे, अशी ग्वाही नूतन बुडा अध्यक्ष आमदार राजू सेट यांनी दिली.

आमदार सेट यांची बेळगाव शहर विकास प्राधिकरणाच्या (बुडा) अध्यक्षपदी निवड झाली आहे. गुरुवारी (दि. २७) त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. मावळते अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे यांनी त्यांच्याकडे कार्यभार सोपवला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी माजी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर व माजी आमदार फिरोज सेट उपस्थित होते.

ते म्हणाले, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, आमचे स्थानिक नेते मंत्री सतीश जारकिहोळी, माजी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर या सर्वांच्या पाठिंब्यामुळे पक्षाने माझ्यावर बुडा अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. माझ्या बेळगाव उत्तर मतदारसंघासह संपूर्ण बेळगावचा विकास करण्याची ही एक संधी आहे. सर्वांना सोबत घेऊन बेळगावचा सर्वांगीण विकास करण्यावर माझा भर राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.

उत्तर कर्नाटकसाठी अल्पसंख्यांक गटातून तुम्ही मंत्रीपद मागितले होते. परंतु, ते मिळाले नाही. अतृप्त असलेल्यांना अशी पदे देऊन समाधान केले जाते, त्यामुळे तुम्ही समाधानी आहात का, या प्रश्नावर ते म्हणाले, हायकमांड व पक्षाने जी जबाबदारी दिली आहे, ती चोखपणे पार पाडण्याचे काम मी करुन दाखवेन. राजकारणात असमाधानी राहून चालत नाही. पक्ष जी जबाबदारी देईल ती व्यवस्थित पार पाडणे, हे आपले आद्य कर्तव्य आहे,

बेळगावच्या विकासाच्या दृष्टीने बरीच कामे थांबलेली आहेत. स्कीम ६१ मधील कणबर्गी ले-आऊटचे वर्षभरात पूर्ण करण्याचा प्रयत्न राहील. याशिवाय वरिष्ठ नेते व अधिकाऱ्यांशी चर्चा करुन बेळगावच्या विकासावर भर दिला जाईल, असे आमदार सेट यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT