Dengue Pudhari
बेळगाव

Belgaum News : डेंग्यूने एकाच दिवशी घेतला दोघांचा बळी

जत्राटमध्ये घबराट; दीड महिन्यापासून साथ

पुढारी वृत्तसेवा

जत्राट : गेल्या दीड महिन्यापासून सुरू असलेल्या डेंग्यूच्या साथीने शनिवारी दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. अभिजित श्रीधर जाधव (वय ३७) आणि आनंदा शंकर कोळी (६९) अशी मृतांची नावे आहेत. एकाच दिवशी दोघांचा मृत्यू झाल्याने जत्राट गावावर शोककळा पसरली असून गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

अभिजित यांच्यावर कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. डेंग्यूच्या आजारामुळे त्यांच्या रक्तातील प्लेटलेट्सची संख्या झपाट्याने कमी झाली. शनिवारी सकाळी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. आनंदा यांच्यावर निपाणी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. पण अचानक रक्तदाब कमी झाल्याने शनिवारी दुपारी त्यांचा मृत्यू झाला. अभिजीत यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे. आनंदा यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

वाढत्या प्रादुर्भावामुळे चिंता

जत्राटमध्ये १० सप्टेंबरपासून डेंग्यूची साथ आहे. आजतागायत सुमारे ३५० जणांना डेंग्यूची लागण झाल्याचा अंदाज आहे. काही जण रुग्णालयांत उपचार घेत आहेत. गावात नवीन रुग्ण आढळून येत असल्याने गावकऱ्यांत चिंता आहे. जिल्हा प्रशासन, तालुका प्रशासनाने गंभीर परिस्थितीची दखल घेऊन तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी गावकऱ्यांतून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT