बेळगाव, नवी दिल्ली : मोबाईल व्हायरसने युक्त एपीके फाईल डाउनलोड करण्यास भाग पाडून देशभरातील २२ हजारांहून अधिक जणांची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय सायबर गुन्हेगारी टोळीचा दिल्ली पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या टोळीने विविध मार्गांनी २० कोटी रुपयांहून अधिक रकमेची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे.
पोलिसांनी झारखंड, बिहार, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशातून २२ जणांना अटक केली आहे. विशेष म्हणजे या टोळीचे सूत्रधार २० वर्षांपेक्षाही कमी वयाचे असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या टोळीच्या फसवणुकीला बेळगाव जिल्ह्यातील काही लोकही बळी पडले असण्याची शक्यता आहे. करण आणि दीपेश नामक तरुण एपीके फाईल्स तयार करणारे प्रमुख सूत्रधार असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यांनी इंटरनेटच्या माध्यमातून सोशल इंजिनिअरिंग आणि इतर तांत्रिक कौशल्ये आत्मसात करून फसवणुकीचे जाळे उभे केले होते. पश्चिम दिल्लीचे पोलीस उपायुक्त हरेश्वर व्ही. स्वामी यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशभरातील २२ हजारांहून अधिक नागरिकांना या टोळीने फसवून घातक एपीके फाईल्स डाउनलोड करण्यास प्रवृत्त केले.
फसवणुकीची पद्धत
टोळीने प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य केले होते. बँकेचे अधिकारी असल्याचे भासवून बँकिंग सेवा, वीज बिल भरणे तसेच गॅस कनेक्शनसंदर्भात मदत करण्याचे आमिष दाखवले जात होते. त्यानंतर व्हॉट्सॲपवरून संपर्क साधून पडताळणी किंवा माहिती अद्ययावत करण्याच्या नावाखाली नागरिकांना एपीके फाईल डाउनलोड करण्यास सांगितले जात होते.
ही फाईल मोबाईलमध्ये इन्स्टॉल होताच संबंधित मोबाईलमधील वैयक्तिक माहिती, बँक खात्याचे तपशील, एसएमएस, ओटीपी, कॉल लॉग आणि गॅलरीतील माहिती आरोपींपर्यंत पोहोचत होती. या माहितीच्या आधारे आरोपी पीडितांच्या बँक खात्यांमध्ये प्रवेश करून परस्पर पैसे काढून घेत होते. मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक करणाऱ्या या टोळीचा पर्दाफाश करण्यात दिल्ली पोलिसांना यश आले आहे.