बेळगाव : कित्तूर राणी चन्नम्मा प्राणीसंग्रहालयात गेल्या पाच दिवसांत दगावलेल्या हरणांचा मृत्यू ‘हेमोऱ्हेजिक सेप्टिसेमिया’ या नावाच्या जीवाणू संसर्ग आजारामुळे झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. बंगळूरहून प्राप्त झालेल्या उत्तरीय तपासणीच्या प्राथमिक अहवालात तसे नमूद आहे. त्या आधारावर प्राणीसंग्रहालयात शिल्लक असलेल्या आठ हरणांवर तज्ज्ञ पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली उपचार सुरु आहेत. तसेच अन्य प्राण्यांना या आजाराची लागण होऊ नये म्हणून निर्जंतुकीकरण केले जात आहे.
हरणांच्या गूढ मृत्यूनंतर बंगळूरमधील पशुवैद्यकीय तज्ज्ञांच्या पथकाने सोमवारी (दि. 16) प्राणीसंग्रहालयाला भेट देऊन शिल्लक असलेल्या हरणांची तपासणी केली. त्यावेळी त्यांना हा यकृताचा आजार असल्याचा संशय आला होता. त्याप्रमाणे उपचार सुरु ठेवण्यात आले आहेत. मात्र, मंगळवारी रोगाचे निदान झाल्याने उपचारांची दिशा बदलण्यात आली. उर्वरीत हरणांना वाचविण्यासाठी अथक प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी मंगळवारी गुजरातमधील प्राणीसंग्रहालयात हरणावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चाही करण्यात आली. कर्नाटक प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाचे सदस्य सचिव सुनील पनवार, बन्नेरघट्टा प्राणीसंग्रहालयाचे तज्ज्ञ डॉक्टर, बेळगावचे मुख्य वनसंरक्षक, उपवनसंरक्षक, साहाय्यक वनसंरक्षक उपचारांवर लक्ष ठेवून आहेत.
गेल्या काही दिवसांपासून प्राणीसंग्रहालयात हरणांचा मृत्यू होत आहे. मात्र, प्राणीसंग्रहालय बंद ठेवलेले नाही. याठिकाणी प्रवेेश आहे की नाही अशी शंका पर्यावरणप्रेमी व शिक्षकांना पडली होती. मात्र, प्राणीसंग्रहालय बंद ठेवलेले नसून केवळ हरणांच्या विभागात प्रवेश बंद ठेवण्यात आला आहे. सहलीसाठी येणाऱ्या मुलांचे स्वागत असून सर्वांनी काळजी करु नये, असे प्राणीसंग्रहालय व्यवस्थापनाने कळविले आहे.