बेळगाव : अत्यंत चुरशीने झालेल्या बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर जारकीहोळी-जोल्ले गटाने अखेर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. रविवारी (दि. 19) सात जागांसाठी मतदान झाले असून यामध्ये अथणीमधून आमदार लक्ष्मण सवदी, रायबागमधून मावळते अध्यक्ष आप्पासाहेब कुलगुडे आणि रामदुर्गमधून मल्लाप्पा यादवाड यांनी विजय संपादित केला. पण, चर्चेचा विषय बनलेल्या हुक्केरी, निपाणी, कित्तूर आणि बैलहोंगल मतदारसंघातील निकाल उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे राखून ठेवण्यात आला.
बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदावरून माजी खासदार रमेश कत्ती यांनी राजीनामा दिल्यापासूनच जोरदार राजकारण सुरू झाले होते. निवडणूक संपण्याआधीच तीन महिन्यांपासून अरभावीचे आमदार भालचंद्र जारकीहोळी यांच्या नेतृत्वाखाली जारकीहोळी आणि माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांचा गट सक्रिय झाला होता. तर दुसरीकडे नाराज माजी खासदार रमेश कत्ती आणि आमदार लक्ष्मण सवदी यांनीही आपला वेगळा गट कामाला लावला होता. त्यामुळे जिल्ह्याचे संपूर्ण राजकारण ढवळून निघाले होते. अखेर या निवडणुकीत जारकीहोळी-जोल्ले गटाला अपेक्षित यश दृष्टीक्षेपात असल्यामुळे वर्चस्व राखण्यात यश आले आहे.
स. 9 ते दु. 4 पर्यंत बी. के. मॉडेल शाळेत मतदान प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत मतदारांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. प्रत्येक उमेदवाराने मतदान शंभर टक्के करून घेण्यासाठी प्रयत्न केले होते. त्यामुळे 690 पैकी 669 मतदान म्हणजेच 96.96 टक्के मतदान झाले. यामध्ये बैलहोंगल, रामदुर्ग, अथणी, कित्तूर, हुक्केरी, निपाणी या मतदारसंघात 100 टक्के मतदान झाले, तर रायबाग येथे 205 पैकी 184 म्हणजेच 89.76 टक्के मतदान झाले.
अथणीमधून आमदार लक्ष्मण सवदी यांनी 122 मते मिळवून प्रतिस्पर्धी माजी आमदार महेश कुमठळ्ळी (3 मते) यांच्यावर विजय मिळवला. मल्लाप्पा यादवाड यांनी 19 मते मिळवून प्रतिस्पर्धी श्रीकांत ढवण (16 मते) यांच्यावर विजय मिळवला आणि रायबागमधून मावळते अध्यक्ष आप्पासाहेब कुलगुडे यांनी 120 मते मिळवून प्रतिस्पर्धी बसगौडा आसंगी (64 मते) यांच्यावर विजय मिळवला.
निपाणी, हुक्केरी, कित्तूर आणि बैलहोंगल येथील काही मतदारांनी न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे त्यांचे मतदान करून घेतले असले, तरी उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठाने निकाल जाहीर करण्यास मनाई केली आहे. 28 ऑक्टोबर रोजी न्यायालयात अंतिम सुनावणी होणार आहे. त्यानंतरच या मतदारसंघातील विजयी उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात येणार आहे, अशी माहिती निवडणूक निकाल अधिकारी, प्रांताधिकारी श्रवण नाईक यांनी दिली. सव्वाचार वाजता मतमोजणी सुरू करण्यात आली. केवळ अर्ध्या तासाच निकाल बाहेर पडले. त्यावेळी मतदान केंद्राबाहेर जमलेल्या समर्थकांनी गुलाल उधळून, फटाके उडवून एकच जल्लोष केला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी शहर पोलिस आयुक्त भूषण बोरसे, जिल्हा पोलिसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद नजर ठेवून होते. सहा वाजता विजयी तिन्ही उमेदवारांना निवडणूक अधिकारी श्रवण नाईक यांनी प्रमाणपत्र दिले.
न्यायालयाच्या आदेशामुळे निकाल रखडला
निपाणी, हुक्केरी, कित्तूर आणि बैलहोंगल या मतदारसंघातील मतमोजणी करण्यात आली. पण, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आम्हाला निकाल जाहीर करता येत नाही, अशी माहिती निवडणूक अधिकारी श्रवण नाईक यांनी दिली. पण, एक्झिट पोलनुसार हुक्केरी मतदारसंघात माजी खासदार रमेश कत्ती, निपाणी मतदारसंघातून माजी खा. अण्णासाहेब जोल्ले, बैलहोंगल मतदारसंघातून माजी आमदार महांतेश दोडगौडर, कित्तूर मतदारसंघातून नानासाहेब पाटील आघाडीवर असल्याचे समजते.
हुक्केरी मतदारसंघातील यलीमुन्नोळी, पाश्चापूर आणि मदिहळ्ळी या तीन, निपाणी मतदारसंघातील कुलीं, माणकापूर, हदनाळ, शेंडूर आणि शिरगुप्पी या पाच, बैलहोंगल मतदारसंघातून चिक्क बेळ्ळीकट्टी व होळेहोसूर या दोन आणि कित्तूर मतदारसंघातून अंबडगट्टी, होस काद्रोळी व सवटगी या तीन पंतसंस्थांच्या मतांची मोजणी होणे शिल्लक आहे. न्यायालयात गेलेल्या या 13 मतदारांच्या मतांची मोजणी केल्यानंतरच निकाल जाहीर होणार आहे.