बेळगाव : किल्ला तलावाच्या मध्यभागी भगवान बुद्ध आणि केएलईजवळील प्रवेशद्वारात राजर्षी शाहू महाराज यांचा पुतळा बसवण्याचा निर्णय झाला असला तरी त्याची अद्याप अंमलबजावणी होत नाही, असे सांगत दलित संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी अध्यक्ष रवी बस्तवाडकर यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी (दि. 12) महापालिका प्रवेशद्वारासमोर आंदोलन केले. दोन्ही पुतळ्यांबाबत तातडीने निर्णय घेण्यात यावा अन्यथा 26 जानेवारी रोजी काळे झेंडे दाखविण्यात येतील, असा इशारा देण्यात आला. त्यामुळे, अखेर महापालिका आयुक्तांनी रस्त्यात बसून आंदोलकांशी चर्चा करावी लागली. यावेळी आंदोलकांची पोलिसांबरोबर झटापटही झाली.
दिवंगत संभाजी पाटील आमदार असताना आणि सतीश जारकिहोळी पालकमंत्री असताना महापालिकेने किल्ला तलावात भगवान बुद्ध आणि केएलईजवळील शहराच्या प्रवेशद्वारात राजर्षी शाहू महाराज यांचा पुतळा उभारण्याचा निर्णय महापालिका सभागृहात झाला होता. त्यानुसार निधीची तरतूद करण्यात आली होती. पण, अद्याप दोन्ही पुतळ्यांची उभारणी झालेली नाही. हा दलितांचा अपमान आहे, असा आरोप करत या पुतळ्याचा निर्णय तत्काळ घेण्यात यावा अन्यथा प्रजासत्ताक दिनी 26 जानेवारी रोजी ध्वजारोहण करु देणार नाही, काळे झेंडे दाखवण्यात येतील, असा इशारा दिला.
महापालिका आयुक्त कार्तिक एम. यांनी आंदोलकांची भेट घेतली. पोलिसांसोबत झटापट झाल्यामुळे सर्व कार्यकर्त्यांनी प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन सुरु केले होते. त्यामुळे, त्यांनीही जमिनीवर बसून कार्यकर्त्यांशी चर्चा केली. सर्वसाधारण सभेत चर्चा करुन निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले. काही वेळानंतर आमदार राजू सेट, महापौर मंगेश पवार यांच्यासह इतर नगरसेवकांनी आंदोलकांची भेट घेऊन याविषयी निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगितले.