बेळगाव : एपीके फाईल ओपन केल्यानंतर मोबाईल हँग होऊन मारुतीनगर सांबरा रोड येथील एका तरुणाच्या खात्यावरील तीन लाख काढून घेण्यात आले. तर महांतेशनगरमधील एका वृद्धाला सिनिअर सिटीझनचे कार्ड मिळवून देतो, असे सांगत १ लाख ५५ हजार रुपये खात्यावरून वर्ग करून घेतले. दोन्ही प्रकरणांची बुधवारी रात्री शहर सीईएन पोलिसांत नोंद झाली आहे.
राजेश्वर या ३३ वर्षांच्या तरुणाच्या मोबाईलवर २९ ऑगस्ट रोजी एकाच दिवशी चार एपीके फाईल्स् आल्या. त्याने सर्वच फाईल्सवर क्लिक केले. यानंतर रात्री त्याने आपला मोबाईल पाहिला असता त्याच्या युनियन बँकेच्या खात्यावरून ३ लाख ४५७ रुपये परस्पर वर्ग केल्याचा मेसेज आला. मधुकर नामक ७३ वर्षीय वृद्धाने सिनिअर सिटीझन कार्ड बनवण्यासाठी ऑनलाईन अर्ज केला होता.
१० सप्टेंबर रोजी एका अनोळखी क्रमांकावरून मेसेज आला. यावेळी समोरच्या व्यक्तीने तुमचे कार्ड पूर्ण करण्यासाठी आणखी काही तपशील हवा आहे, असे म्हणत व्यक्तिगत माहितीसह बँकेचा तपशीलही मागवून घेतला. यानंतर त्यांच्या बँक ऑफ इंडियाच्या खात्यावरून १ लाख ५५ हजार ४०० रुपयांची रक्कम परस्पर वर्ग झाल्याचे आढळून आले.