बेळगाव : ऑनलाईन टास्क पूर्ण केल्यास गुंतवलेल्या रकमेवर ३० टक्के नफा देण्याचे आमिष दाखवून सायबर भामट्यांनी मजगावच्या रहिवाशाची २ लाख ६१ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. गेल्या २० ते २९ सप्टेंबर या कालावधीत हा प्रकार घडला असून, बेळगाव शहर सायबर पोलिस ठाण्यात २५ ऑक्टोबर रोजी अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजू मल्लाप्पा दयामगोल (वय ४२, रा. गणपती गल्ली, मजगाव) फसलेल्या तरुणाचे नाव आहे. तक्रारीनुसार, २० सप्टेंबर रोजी दुपारी एका अनोळखी व्यक्तीने मोबाईलवर संदेश पाठवून आपण लिआना रोरी बिझनेसशी संबंधित असल्याचे सांगितले. ऑनलाईन टास्कमध्ये पैसे गुंतवून तो पूर्ण केल्यास गुंतवलेल्या रकमेवर ३० टक्के नफा मिळेल, असेही आमिष दाखविण्यात आले.
सुरुवातीला राजूने १ हजार रुपये भरले. टास्क पूर्ण केल्यानंतर त्याला १ हजार ४०० रुपये परत मिळतील, असे सांगण्यात आले. त्यानुसार त्याला १४०० रुपये देण्यात आले. या व्यवहारावर विश्वास बसल्याने तक्रारदाराने पुढील टास्कसाठी पैसे भरण्यास सुरुवात केली. त्यानंतर कर्नाटक बँक, युनियन बँक आणि बँक ऑफ बडोदा येथील खात्यांमधून एकूण २ लाख ६१ हजार ७९६ रुपये हस्तांतरित करण्यात आले. मात्र, त्यांना पैसे परत करण्यात आले नाहीत . त्याचबरोबर नफाही देण्यात आला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर राजूने पोलिसांत धाव घेतली.
यापूर्वी या प्रकरणाची झीरो एफआयआर म्हणून नोंद करण्यात आली होती. त्यानंतर राष्ट्रीय सायबर गुन्हे तक्रार प्रणालीमार्फत हे प्रकरण संबंधित पोलिसांकडे वर्ग करण्यात आले. सायबर पोलिस पुढील तपास करीत आहेत.