बेळगाव : मोबाईलवर अनोळखी क्रमांकावरून आलेल्या संदेशातील लिंकवर क्लिक करणे अनगोळमधील एका व्यावसायिकाला चांगलेच महागात पडले आहे. सायबर भामट्यांनी त्यांच्या बँक खात्यातून टप्प्याटप्प्याने ३ लाख २४ हजार ५९८ रुपये परस्पर हस्तांतरित करून फसवणूक केली. याप्रकरणी शेख यांनी बेळगाव शहर सीईएन सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
एका अनोळखी व्यक्तीने १३ नोव्हेंबर रोजी शेख यांच्या मोबाईलवर संपर्क साधला. संबंधिताने ८०३५०४९६२८ या क्रमांकावरून कॉल केला. मात्र, कोणताही प्रतिसाद न देता कॉल कट केला. त्यानंतर याच क्रमांकावरून वारंवार कॉल येऊ लागले. दरम्यान, त्यांच्या दुसऱ्या मोबाईल क्रमांकावर पाठविण्यात आलेल्या संदेशातील लिंकवर त्यांनी क्लिक केले. या घटनेनंतर १६ नोव्हेंबर रोजी ते बँक ऑफ इंडियाच्या अनगोळ शाखेत गेले असता त्यांच्या खात्यातून टप्प्याटप्प्याने एकूण ३ लाख २४ हजार ५९८ रुपये काढण्यात आल्याचे बँक व्यवस्थापकाने सांगितले.
प्रकरण सायबर पोलिसांकडे वर्ग
आपल्या नकळत खात्यातील रक्कम हस्तांतरित झाल्याचे समजल्यानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेतली. याप्रकरणी माहिती तंत्रज्ञान कायदा २००० मधील कलम ६६ (सी) आणि ६६ (डी) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी या प्रकरणाची झिरो एफआयआरद्वारे नोंद झाली होती. त्यानंतर हे प्रकरण सायबर पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे. अनोळखी व्यक्तीचा शोध घेऊन पुढील तपास सुरू आहे.