अथणी : अपघाताचा बनाव करून पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. खिळेगाव (ता. अथणी) येथील चंद्रकांत संगप्पा शिवपुजी (वय ४१) यांचा ८ ऑगस्ट रोजी शिरूरजवळ झालेला मोटारसायकल अपघात नसून खून असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी पत्नी रेणुका चंद्रकांत शिवपुजी (वय ३१) व महांतेश बसप्पा धनाळे (वय ४०) यांना अथणी पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार ८ ऑगस्ट रोजी चंद्रकांत हे ऐनापूर येथे काविळीचे औषध आणण्यासाठी जात असल्याचे सांगून घरातून मोटारसायकलवरून निघाले होते. शिरूरजवळ आल्यानंतर त्यांना बाजूला थांबवून महांतेश धनाळे याने लोखंडी रॉडने त्यांच्या डोक्यात व कपाळावर वार करून खून केला. त्यानंतर हा प्रकार अपघात असल्याचा बनाव करण्यासाठी मृतदेहाजवळ मोटारसायकल ठेवण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे.
पोलिसांनी मोटारसायकल जप्त केली आहे. खून करण्यासाठी वापरण्यात आलेले साहित्य कालव्यात टाकण्यात आले होते. पोलिसांनी तपास करून साहित्यही जप्त केले आहे. चंद्रकांत यांचे भाऊ सुरेश शिवपुजी यांनी अथणी पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी कसून तपास केला. त्यामध्ये खुनाचा प्रकार उघडकीस आला आहे.
पोलिस तपासात रेणुका व महांतेश यांच्यात अनैतिक संबंध असल्याचे समोर आले असून चंद्रकांत हे त्यांच्या संबंधात अडथळा ठरत असल्याने दोघांनी मिळून खुनाचा कट रचल्याचे पोलिसांनी सांगितले. चंद्रकांत बाहेर गेल्यावर त्याची माहिती रेणुका हिने मोबाईलवरून महांतेशला दिल्याचेही तपासात उघड झाले आहे. त्यानंतर अथणी येथून लोखंडी सळी खरेदी करून चंद्रकांत यांच्यावर हल्ला करण्यात आला. खून केल्यानंतर अपघाताचा बनाव करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी दोन्ही संशयितांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा पोलिस कसून तपास करीत आहेत. सदर कारवाई जिल्हा पोलिस प्रमुख के. रामराजन, डीवायएसपी प्रशांत मुन्नोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सीसीपीआय संतोष हळूर यांनी पथक तयार करून केली. अथणी पोलिस ठाण्याच्या गुन्हे विभागाचे उपनिरीक्षक मल्लिकार्जुन तळवार, पोलिस कर्मचारी ए. ए. इरकर, बी. आर. पाटील, एम. एस. कोंडी, जी. आय. पटवेगार, जी. पी. राठोड, एस. बी. खोत, बी. एम. तळवार, पी. आर. अरळीमट्टी यांनी संशयितांना अटक करण्यासाठी प्रयत्न केले.