बेळगाव : लग्नाचे आमीष दाखवून अल्पवयीन मुलीला बंगळूर येथे नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करणार्या नराधमाला 20 वर्षांचा सश्रम करावा आणि 1 लाख 18 हजार रुपये दंड अशी शिक्षा जिल्हा पोक्सो न्यायालयाने सुनावली आहे. प्रवीण भीमराव आऊबाईगोळ (वय 23, रा. बेळवी ता. हुक्केरी) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.
प्रवीण याने एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमीष दाखवून हुक्केरी बस स्थानकावर बोलावून घेतले. त्यानंतर तिला बंगळूर येथे नेले. त्या ठिकाणी तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर त्याने लग्नाला नकार दिला. यामुळे प्रवीण याच्याविरोधात हुक्केरी पोलिस स्थानकामध्ये तिच्या पालकांनी तक्रार दिली.
हुक्केरी पोलिस स्थानकाच्या महिला पोलीस उपनिरीक्षक एल. एल. पट्टण्णावर यांनी फिर्याद दाखल करून घेतली. याप्रकरणी एम. एम .ताशिलदार यांनी तपास केला व येथील पोक्सो न्यायालय मध्ये दोषारोप दाखल केले. न्यायालयात 11 साक्षी, 48 कागदपत्र पुरावे, 2 मुद्देमाल तपासण्यात आले. त्यामध्ये आरोपी प्रवीण दोषी आढळल्याने न्यायाधीश सी. एम. पुष्पलता यांनी त्याला 20 वर्षाचा सश्रम करावास आणि दंड ठोठावला आहे. न्यायाधीशांनी जिल्हा कायदा सेवा प्राधिकारला पीडित मुलीला 4 लाख रुपये देण्याचे आदेश बजावले आहेत. सरकारी वकील म्हणून एल. व्ही. पाटील यांनी काम पाहिले.