बेळगाव : अन्य जातीच्या तरुणासोबत आपली मुलगी पळून जाऊन त्याच्याशी लग्नाचा हट्ट धरणाऱ्या तरुणीची घरच्यांनी विष पाजून हत्या केल्याचा प्रकार एप्रिलमध्ये घडला होता. त्यानंतर प्रकरणातील तरुणानेही ४ जूनरोजी त्याच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा दुर्दैवी प्रकार घडला आहे.
कृष्णा सहदेव पाटील (वय ३०, रा. नदीगुडीक्षेत्र, ता. हुक्केरी) असे मृताचे नाव आहे. त्याची मृत प्रेयसी सत्यव्वा संतोष हेळवी (रा. हुब्बरवाडी, ता. रायबाग) हिचा ४ जून हा वाढदिवस. त्याच दिवशी कृष्णाने आपले जीवन संपवले.
कृष्णा पाटील याचे गावातच असलेल्या हेळवी समाजाच्या तरुणीवर प्रेम होते. दोघे लग्न करणार होते. पण तरुणीच्या घरच्या लोकांनी तिचे आपल्या जातीत रायबगाच्या तरुणाशी लग्न लावून दिले. मात्र तरुणी काही दिवसांनी माहेरी आल्यानंतर सासरी गेलीच नाही. काही दिवसांनी तरुणी आणि कृष्णा घरातून पळूनही गेले होते. परंतु तरुणीच्या घरच्यांनी तक्रार केल्यानंतर पोलिसांनी दोघांना शोधून आणले. तसेच तरुणीला तिच्या घरच्यांच्या हवाली केले.
तथापि, तरुणीने आपला पती दारू पिऊन मारतो, मी नांदायला जाणार नाही, असे स्पष्ट सांगत आपण कृष्णाशीच विवाह करणार असल्याचे घरच्यांना सांगितले. तरीही पोलिसांनी तरुणीला तिच्या माहेरी पाठवून दिले. त्यानंतर माहेरच्या लोकांनी तिला आरग (ता. मिरज, जि. सांगली) येथील स्मशानभूमीत नेऊन तिचा विष पाजून खून केला.
प्रियकर कृष्णा पाटील आणि त्याच्या प्रेयसीला मूळगावी आणण्यात आले. मात्र त्यानंतर काही दिवसांनी प्रेयसी माहेरातून बेपत्ता झाली. त्यानंतर कृष्णाने यमकनमर्डी पोलिसांना आपली प्रेयसी बेपत्ता झाल्याची फिर्याद दिली होती.
पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी यांनी तपास सुरू केला तेव्हा खुनाची घटना उघडकीस आली. या प्रकरणी मृत महिलेचा भाऊ, दीर व काकाला अटक केली. त्यानंतर या प्रकरणावर पडदा पडला असे वाटत असतानाच या महिलेच्या प्रियकराने आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
१३ एप्रिलरोजी प्रेयसीच्या खुनाची घटना उघडकीस आल्यापासून कृष्णा अस्वस्थ होता. त्याची मानसिक स्थिती ढासळली होती. एकत्रित कुटुंबात वाढलेल्या कृष्णाला घरचे धीर देण्याचा प्रयत्न करत होते. परंतु, तो सतत सत्यव्वाच्या आठवणीत झुरत राहायचा. यातूनच त्याने गळफास घेतल्याचा संशय यमकनमर्डी पोलिसांनी व्यक्त केला. विशेष म्हणजे ४ जून रोजी सत्यव्वाचा वाढदिवस होता. याच दिवशी दिवसभर तिची आठवण काढत सायंकाळच्या वेळी त्याने गळफास घेतला. पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.