firing pudhari photo
बेळगाव

Belgaum Crime: तवंदी घाटात गोळीबाराने खळबळ

टेंडरच्या वादातून घटना; रिव्हॉल्व्हरसह इचलकरंजीतील तिघे ताब्यात

पुढारी वृत्तसेवा

निपाणी : तवंदी घाट येथील हॉटेल व्हाईट हाऊसनजीक शनिवारी सायंकाळी स्क्रॅप टेंडरच्या वादातून झालेल्या गोळीबाराच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी निपाणी शहर पोलिसांनी रविवारी इचलकरंजी (जि. कोल्हापूर) येथील तिघांना रिव्हॉल्व्हरसह ताब्यात­ घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. रात्री उशिरापर्यंत तपास सुरू असल्याने या प्रकरणाची अधिकृत माहिती मिळू शकली नाही. दरम्यान गोळीबार झालेल्या व्यक्तीने शनिवारी रात्री निपाणी शहर पोलिसांत तिघांविरोधात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र-कर्नाटक आणि गोवा राज्यातील स्क्रॅप टेंडर घेणाऱ्या व्यावसायिकांची बैठक तवंदी घाट परिसरातील हॉटेल व्हाईट हाऊसनजीक येथे सुरू होती. यावेळी एका टेंडरच्या कारणावरून दोन गटांमध्ये वादावादी झाली. वाद वाढल्यानंतर इचलकरंजीतील एका टेंडर व्यावसायिकाने दुसऱ्या व्यावसायिकावर रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. मात्र, संबंधित व्यावसायिक वेळीच खाली वाकल्याने तो बचावला.

घटनेची माहिती मिळताच चिकोडीचे डीएसपी गोपाळकृष्ण गौडर, सीपीआय बी. एस. तळवार, निपाणी शहर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक शिवानंद कार्जोळ यांच्यासह पोलिस पथकाने घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला. या प्रकरणात पोलिसांनी तिघांना रिव्हॉल्व्हरसह ताब्यात घेतले आहे. संबंधित बंदूक कोणाच्या नावावर आहे, ती कोठून खरेदी करण्यात आली, तसेच या घटनेमागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलिस पथक करत आहे.

रविवारी रात्री उशिरापर्यंत या प्रकरणाबाबत पोलिसांकडून सविस्तर माहिती मिळू शकली नाही. सोमवारी या प्रकरणाचा उलगडा होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे तवंदी घाट परिसरात तसेच व्यावसायिक वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली असून पोलिसांनी तपास अधिक तीव्र केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT