बेळगाव ः आपल्या विधवा मुलीच्या नावावर असलेल्या पैशासाठी प्रेमाचे नाटक केल्याचा राग धरत मुलीचे वडील, मुलगा व दोघा जावयांनी घटस्फोटित अभियंत्यावर खुनी हल्ला केला. यामध्ये सदर अभियंता गंभीर जखमी झाला आहे. बुधवारी रात्री क्लब रोडवर घडलेल्या या घटना प्रकरणी एपीएमसी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.
योगेश जालिंदर चौधरी (वय 39, रा. संपगाव, बैलहोंगल, जि. बेळगाव) असे जखमी अभियंत्याचे नाव आहे. नामदेव पाटील, त्यांचा मुलगा संदेश पाटील, जावई संदीप वरपे आणि नारायण झेंडे (चौघे रा. बेळगाव) अशी अटक केलेल्या चौघांची नावे आहेत. त्यांना अटक करून गुरुवारी त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. एपीएमसी पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः यातील मुख्य संशयिताची मुलगी शुभांगी यांचा लष्करी जवानाशी विवाह झाला होता. सेवा बजावताना जवानाचा मृत्यू झाल्यानंतर मोठी रक्कम शुभांगी यांना मिळाली होती. ही रक्कम त्यांनी स्वतःच्या व आईच्या नावे संयुक्त बँक खात्यात ठेवली होती.
प्रकरणातील जखमी अभियंता योगेश यांचाही विवाहानतर तीन वर्षांपूर्वी घटस्फोट झाला. त्यामुळे ते दुसऱ्या लग्नाचा विचार करत होते. पाच महिन्यांपूर्वी त्यांचा संपर्क शुभांगीशी आल्यानंतर दोघे प्रेमात पडले. यानंतर त्यांनी लग्नाचा विचार सुरू केला. यावेळी आपल्या नावावरील रक्कम आपल्याला परत द्यावी, असा हट्ट शुभांगीने आई-वडिलांकडे धरला होता. गंभीर जखमी अवस्थेत योगेश यांना जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी एपीएमसी पोलिसांनी तातडीने चौघांना अटक केली. पोलीस निरीक्षक उस्मान आवटी तपास करत आहेत.
पाळत ठेवून हल्ला
आपल्या मुलीला फशी पाडून योगेश हेच शुभांगीकडील रक्कम मागत असल्याचा राग शुभांगीच्या वडिलांना होता. यामुळे त्यांनी योगेश यांच्यावर पाळत ठेवली होती. बुधवारी रात्री योगेश हे क्लब रोडवरील हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. यावेळी उपरोक्त चौघा संशयितांनी त्यांच्यावर पाळत ठेवली होती. ते जेवण करून बाहेर पडताना त्यांना अर्वाच्य शिवीगाळ करत लोखंडी रॉडने जबर मारहाण केली.