बेळगाव : कॉलेज रोडवर तरुणांच्या दोन गटांत शनिवारी दुपारी राडा झाला. एकाने तलवार काढून हल्ला केल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. परंतु, पोलिसांनी ती तलवार नसून लोखंडी रॉड असल्याचा दावा केला. शनिवारी दुपारी अडीचच्या सुमारास कॉलेज रोडवर ही घटना घडली.
याबाबत माहिती अशी की, शनिवारी दुपारी दीडच्या सुमारास तरुणांच्या दोन गटांत अचानक धक्काबुक्की सुरू झाली. कॉलेजच्या फाटकापासून पदपथावर दोन्ही गटातील तरुण एकमेकांना ढकलत पुढे गेले. एका तरुणाचा पाठलाग करून मारहाण सुरू केली. यानंतर अन्य काही तरुण जमल्यानंतर हल्ला झालेला तरुण पळून जाऊ लागला. तेव्हा त्याचा पाठलाग करून मारबडव करण्यात आली. यावेळी पांढरा शर्ट व काळी पॅन्ट घातलेला एका तरुणाने तलवार घेऊन तरुणाचा पाठलाग करत हल्ला केला. यामध्ये सदर तरुणाच्या कानाजवळ व डोक्याला किरकोळ दुखापत झाली.
घटनेची माहिती मिळताच खडेबाजारचे पोलीस उपनिरीक्षक किरण होनकट्टी, हेड कॉन्स्टेबल शेट्टी यांनी घटनास्थळी दाखल झाले. तत्पूर्वी हल्लेखोर व जखमी तरुणही तेथूनन पसार झाले होते. घटना कॅम्प पोलीस ठाणा हद्दीत येत असल्याने कॅम्पचे निरीक्षक आनंद वणकुद्रे यांना कळवण्यात आली. कॅम्पचे ॲन्टी स्टॅबिंग पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी येथून ये-जा करणाऱ्या काही तरुणांच्या बॅग तपासल्या. परंतु, कोणाच्याही बॅगेत आक्षेपार्ह काही आढळले नाही.
याबाबत कॅम्प पोलिसांशी संपर्क साधला असता त्यांनी माहिती दिली की, जखमीचा शोध घेतला परंतु, तो मिळाला नाही व हल्लेखोर कोण हे देखील कळले नसल्याने याची नोंद झालेली नाही. त्यामुळे हा हल्ला नेमक्या कोणत्या कारणातून झाला, याचा तपशील मिळू शकला नाही. हल्लेखोराच्या हातात तलवार होती का, याबाबत विचारणा केली असता ते स्पष्ट दिसलेले नसून लोखंडी रॉड असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. तथापि, ती तलवारच होती, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.