निपाणी : तवंदी घाट परिसरात सलग दुसऱ्या दिवशी ढगफुटीसदृश पाउस झाल्याने निपाणी-बेळगाव राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली. मुसळधार पावसामुळे डोंगर उतारावरून मोठ्या प्रमाणात पाणी, माती आणि दगड रस्त्यावर आल्याने महामार्गाला ओढ्याचे स्वरूप आले होते. अचानक निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे वाहनधारकांची मोठी तारांबळ उडाली.
बुधवारीही तवंदी घाट परिसरात जोरदार पाऊस झाला होता. त्यानंतर आज दुपारपासून पुन्हा पावसाचा जोर वाढला. डोंगर भागातून पाण्याचा प्रचंड प्रवाह रस्त्यावर आल्याने अनेक ठिकाणी चिखल साचला. त्याचबरोबर लहान-मोठे दगड रस्त्यावर घसरून आल्याने वाहनांना पुढे जाणे कठीण झाले. काही वेळातच महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली.
तवंदी घाट हा निपाणी-बेळगाव मार्गावरील महत्त्वाचा आणि वर्दळीचा भाग असल्याने रस्त्यावर दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या. प्रवासी, मालवाहू वाहने आणि इतर वाहनधारकांना मोठा फटका बसला. पावसाचा जोर कायम असल्याने रस्त्यावर वारंवार पाणी आणि माती येत होती. त्यामुळे प्रशासनासमोर वाहतूक सुरळीत करण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले.
घटनेची माहिती मिळताच बांधकाम अवताडे कंपनीच्या विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि स्थानिक घटनास्थळी दाखल झाले. जेसीबीच्या साहाय्याने रस्त्यावर आलेली माती, दगड बाजूला करून वाहतूक सुरू करण्याचे प्रयत्न करण्यात आले. मात्र पावसाचा जोर वाढल्याने पुन्हा पुन्हा रस्त्यावर अडथळे निर्माण होत होते.
स्थानिक नागरिकांच्या मते, तवंदी घाटातील डोंगराचे सुरू असलेले अनियंत्रित उत्खनन, तसेच रस्त्याच्या कडेला योग्य पद्धतीने गटारी नसणे ही समस्या वाढण्याची प्रमुख कारणे आहेत. दरवर्षी पावसाळ्यात डोंगरावरील माती आणि पाणी थेट महामार्गावर येत असल्याने वाहतुकीला अडथळे निर्माण होतात. यामुळे वाहनधारकांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही गंभीर बनला आहे.