खानापूर : खानापूर शहरालगतच्या कुप्पटगिरी क्रॉस परिसरात चोरट्यांनी दिवसाढवळ्या दोन बंद घरांना लक्ष्य करीत घरफोडी केली. बुधवारी सकाळी ११ ते १२ च्या सुमारास घडलेल्या या घटनेत सुमारे सात तोळे सोन्याचे दागिने, चांदीच्या वस्तू आणि १ लाख १५ हजार रुपये असा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. एकाचवेळी दोन घरांमध्ये चोरी झाल्याने परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कुप्पटगिरी क्रॉस येथे दत्ता भालकेकर आणि ज्योतिबा होसूर यांची घरे आहेत. बुधवारी सकाळी दोन्ही कुटुंबीय घराबाहेर असल्याची संधी साधून चोरट्यांनी घरफोडी केली. दत्ता भालकेकर यांच्या घराचा दरवाजा तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. तिजोरी फोडून त्यातील आठ ग्रॅम सोन्याचे दागिने, एक लाख रुपये रोख आणि सुमारे १०० ग्रॅम चांदीच्या वस्तू चोरून नेल्या. त्यानंतर चोरट्यांनी जोतिबा होसूर यांच्या घराकडे मोर्चा वळविला. त्यांच्या घरातून सुमारे सहा तोळे सोन्याचे दागिने, चांदीच्या वस्तू आणि १५ हजार रुपये रोख असा ऐवज लंपास केला. चोरीस गेलेल्या सोन्याच्या दागिन्यांमध्ये गंठण, मंगळसूत्र, कर्णफुले, अंगठ्या आदी दागिन्यांचा समावेश आहे.
दुपारी घरी परतल्यानंतर घराचा दरवाजा उघडा दिसल्याने दत्ता भालकेकर यांच्या कुटुंबीयांना संशय आला. घरात प्रवेश केल्यानंतर तिजोरी फोडलेली आणि सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले. त्याचप्रमाणे ज्योतिबा होसूर यांच्या पत्नी दुपारी घरी परतल्यानंतर त्यांच्या घरातही चोरी झाल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तातडीने शेजाऱ्यांना याची माहिती दिली.
ठसे तज्ज्ञ, श्वानपथक दाखल
घटनेची माहिती मिळताच खानापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सायंकाळी ठसे तज्ज्ञ आणि श्वानपथकाला पाचारण करण्यात आले. श्वानपथकाने पारिश्वाड रस्त्यावरील शेडपर्यंत माग काढला; मात्र त्यानंतर श्वान तेथेच घुटमळले. ठसे तज्ज्ञांनी घटनास्थळावरून नमुने घेतले असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.