Belgaum Rain : शहर, तालुक्याला वळवाने झोडपले Pudhari
बेळगाव

Belgaum Rain : शहर, तालुक्याला वळवाने झोडपले

गारांचाही वर्षाव; झाडे कोसळण्याचे सत्र, रस्ते पाण्याखाली

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : शहरासह ग्रामीण भागाला मंगळवारी (दि. 24) वळीव पावसाने झोडपून काढल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले. काही रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचून होते. तर काही ठिकाणी झाडे कोसळण्याचे प्रकार घडले. सखल भागातील घरांत पाणी शिरल्याच्या घटनाही घडल्या. एकंदरीत पावसाने जनजीवन विस्कळीत झाले होते.

सकाळपासूनच उष्यामध्ये वाढ झाली होती. दुपारी साडेतीनच्या सुमारास ढगांचा गडगडाट, विजेचा कडकडाटासह व जोरदार वाऱ्यांसह पावसाचे आगमन झाले. काही काळ गारांचाही वर्षाव झाला. अचानक आलेल्या पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली. काही वेळातच अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी झाले. पावसामुळे अनेक ठिकाणी गटारी तुडुंब भरून वाहत होत्या. रस्त्यांवरही गुडघाभर पाणी साचून होते. शहराच्या मुख्य बाजारपेठेतील गणपत गल्ली, मारुती गल्ली, रविवार पेठ आदी भागातील बैठ्या विक्रेत्यांची दाणादाण उडाली. बाजार खरेदीसाठी आलेल्यांनाही आडोसा शोधावा लागला. या पावसामुळे बाजारपेठेत पाणीच पाणी झाले होते. त्यातून वाट काढताना कसरत करावी लागत होती.

शहरासह उपनगरे आणि ग्रामीण भागातही जोरदार पाऊस कोसळला. शिवाजीनगर, गांधीनगर परिसरात रस्त्यावरून पाणी वाहत होते. त्यातून वाट काढताना दुचाकीस्वारांना कसरत करावी लागत होती. ग्रामीण भागात जोरदार पाऊस झाल्याने रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यंदा कडधान्य काढणी उशिराने सुरू झाली आहे. त्यामुळे या पावसात कडधान्य पीक सापडून नुकसान झाले आहे. महत्त्वाचे म्हणजे जास्त फटका जोंधळा, भाजीपाला यांना बसला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT