Cyber Crime Pudhari
बेळगाव

Belgaum Cyber Crime: आरटीओ चलन; साडेचार लाखांचे पतन

बनावट एपीके फाईलद्वारे चिकोडीतील युवकाची फसवणूक

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : आरटीओ चलनच्या नावाने व्हॉट्स अॅपवर पाठविलेल्या एपीके फाईलवर क्लिक करणे चिकोडीतील एका युवकाला चांगलेच महागात पडले आहे. सायबर गुन्हेगारांनी युवकाच्या मोबाईलची व बँक खात्याची माहिती मिळवून त्याच्या खात्यातून तब्बल ४ लाख ८३ हजार रुपयांहून अधिक रक्कम ऑनलाईनद्वारे लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी बेळगाव सायबर क्राईम ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

चिकोडीतील युवकाचे स्थानिक कॅनरा बँकेत खाते असून, २४ ऑगस्ट २०२६ रोजी त्याच्या मोबाईलवर व्हॉट्स अॅपच्या माध्यमातून आरटीओ चलन वाटणारी एपीके फाईल पाठविण्यात आली होती. ही फाईल खरी असल्याचा समज करुन घेत युवकाने त्यावर क्लिक केले. त्यानंतर सायबर गुन्हेगारांनी त्याच्या मोबाईलमधील माहितीचा गैरवापर करुन बँक खात्यावर नियंत्रण मिळविल्याचा संशय आहे. त्याच दिवशी युवकाच्या खात्यातून विविध ऑनलाईन व्यवहारांद्वारे मोठी रक्कम काढण्यात आली.

खात्यातून रक्कम कमी झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर युवकाने तातडीने पोलिसांकडे धाव घेतली. तपासात युवकाची ४ लाख ८३ हजार रुपयांहून अधिक रकमेची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. सायबर क्राईम विभागाने अज्ञात सायबर गुन्हेगारांविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

आरटीओ चलन, बँक, केवायसी अपडेट किंवा सरकारी सूचना यांच्या नावाने मोबाईलवर येणाऱ्या अनोळखी एपीके फाईल्सवर क्लिक करु नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे. तरीदेखील सर्वसामान्य जनता बळी पडत आहे. सायबर गुन्हेगारांच्या आमिषाला बळी न पडता अनोळखी लिंक, एपीके फाईल किंवा संदेशांवर क्लिक करण्यापूर्वी खात्री करावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT