बेळगाव : जनगणनेच्या कामासाठी वापरण्यात येत असलेल्या एचएलओ ॲपमधील तांत्रिक बिघाडामुळे शिक्षकांची प्रचंड गैरसोय होत आहे. त्यातच आवश्यक किटही न मिळाल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. दिवसभर होणाऱ्या ॲपच्या त्रासामुळे गणतीचे काम विस्कळीत झाले असून शिक्षकांना अक्षरशः वैतागले आहेत.
शिक्षकांना ‘ॲप अपडेट करा’ असा संदेश मिळाल्यामुळे अनेक शिक्षकांनी ॲप अपडेट केले. मात्र, त्यानंतर ॲप न उघडणे, लॉगिन न होणे, डेटा सेव्ह न होणे अशा समस्या वारंवार निर्माण होत आहेत. फिल्डमध्ये घराघरांत जाऊन माहिती नोंदविताना ॲप बंद पडल्याने अनेकांना पुन्हा पुन्हा काम करावे लागले.
तांत्रिक साहाय्यकांकडून ‘ॲप लॉग आऊट करुन पुन्हा लॉगिन करा’ असा सल्ला देण्यात येत होता. मात्र, दिवसभर लॉगआउट-लॉगिनच्या प्रक्रियेमुळे शिक्षक अक्षरशः हैराण झाले आहेत. काही शिक्षकांनी ॲपच्या भरोशावर न राहता वही, कागद आणि पेन्सिलच्या मदतीने जुनी पद्धत वापरुन माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. ॲप व्यवस्थित चालू झाल्यावर माहिती भरायची, असा पर्याय त्यांनी स्वीकारला.दरम्यान, जनगणनेच्या कामासाठी आवश्यक असलेले किटही अद्याप शिक्षकांना देण्यात आलेले नाही. त्यामुळे, पेन, कागद, वही यांसारख्या मूलभूत वस्तूही शिक्षकांना स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करुन खरेदी कराव्या लागत आहेत. आधीच अनेक शिक्षकांचा मार्चचा पगारही अद्याप मिळालेला नसताना, खिशाला कात्री लावून हे काम करावे लागत असल्याने शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
भरीस भर म्हणजे घरांचे वाटप करतानाही मोठी विसंगती दिसून येत आहे. काही शिक्षकांना फक्त 40 ते 50 घरे देण्यात आली आहेत तर काहींवर 300 घरे आणि तब्बल 600 कुटुंबांची नोंदणी करण्याची जबाबदारी टाकण्यात आली आहे. या असमतोलामुळे अनेक शिक्षकांवर प्रचंड कामाचा ताण पडत असून प्रत्यक्ष फिल्डमध्ये अडचणी वाढल्या आहेत.
एकंदर, कडक उन्हात दुर्गम भागात जाऊन जनगणनेचे काम करणाऱ्या शिक्षकांना तांत्रिक अडचणी, किटचा अभाव, पगाराची थकबाकी आणि असमतोल कामाचा ताण या चौफेर समस्यांना सामोरे जावे लागत आहे. प्रशासनाने तातडीने ॲपमधील त्रुटी दूर करुन आवश्यक साहित्य उपलब्ध करुन द्यावे व कामाचे योग्य वाटप करावे, अन्यथा शिक्षकांमधील असंतोष अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.