Accident Pudhari
बेळगाव

Belgaum Accident : मालवाहू वाहन ठरले काळ; दाम्पत्यासह तिघे मृत्युमुखी, दुचाकीला समोरून धडक

तिघे जखमी; देमट्टी येथील दुर्घटना

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : टाटा एस मालवाहू वाहन आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात पती-पत्नीसह त्यांचा भाचा असे तिघे जण ठार झाले, तर तिघे जण जखमी आहेत. कित्तूर तालुक्यातील देमट्टी गावाजवळ मल्लापूर-देमट्टी रस्त्याच्या उतरतीला सोमवारी रात्री हा अपघात झाला.

आझाद इस्माईल जमादार (वय ५५), त्यांची पत्नी खैरून आझाद जमादार (वय ४८) आणि आझाद यांचा भाचा बाबाजान निसार अहमद तडकोड (वय १७, तिघे रा. देमट्टी, ता. कित्तूर) अशी मृतांची नावे आहेत. पोलिसांत दाखल झालेल्या तक्रारीनुसार, आझाद जमादार हे दुचाकीवरून देमट्टीहून कित्तूरच्या दिशेने जात होते. त्यांच्या दुचाकीवर मागे त्यांची पत्नी खैरून आणि बाबाजान तडकोड हेही होते. कित्तूरहून देमट्टीकडे जाणाऱ्या टाटा एसने त्यांच्या दुचाकीला समोरून जोराची धडक दिली. टाटा एसचा चालक सिद्धाप्पा मलप्पनावर याने उतारावर वाहन अतिवेगाने आणि निष्काळजीपणे चालवल्याने हा अपघात झाला आहे.

धडकेमुळे दुचाकीवरील तिघांच्या डोक्याला, हातापायांना गंभीर दुखापत झाली. स्थानिक नागरिकांनी जखमींना तातडीने कित्तूर येथील सरकारी रुग्णालयात नेले. तेथून पुढील उपचारांसाठी त्यांना बेळगाव जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले; मात्र उपचार सुरू असताना आझाद जमादार आणि बाबाजान तडकोड यांचा मृत्यू झाला, तर खैरून जमादार यांचा मंगळवारी रात्री मृत्यू झाला.

कित्तूर पोलिसांत टाटा एस चालक सिद्धाप्पा मलप्पनावर याच्याविरुद्ध अतिवेगाने आणि निष्काळजीपणे वाहन चालवून अपघात घडवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कित्तूर पोलीस पुढील तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT