Burglary Pudhari
बेळगाव

Belgaum Burglary: भवानी नगरात बंद घर फोडले

आठ लाखांचे दागिने लंपास; पाच तोळे सोने, चांदीसह रोकडचा समावेश

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : भवानीनगर-मंडोळी रोडवरील वाटवे कॉलनीतील बंद घर फोडून चोरट्यांनी पाच तोळ्यांचे सोन्याचे दागिने, चांदीच्या वस्तू व ४५ हजारांची रक्कम लंपास केली आहे. या ऐवजाची किंमत आठ लाखांहून अधिक होत असली, तरी पोलिसांनी सव्वासहा लाखांची नोंद केली आहे. शुक्रवारी सकाळी उघडकीस आलेल्या या घटनेची वडगाव पोलिसांत रात्री उशिराने नोंद झाली आहे. घर बंद करून गेल्यानंतर पाळत ठेवून ही घरफोडी झाल्याचा संशय आहे.

घरमालक सिद्धार्थ अनिल चौगुले (रा. वाटवे कॉलनी मंडोळी रोड भवानीनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ते २७ ऑगस्टरोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले होते. २८ रोजी सकाळी दहाच्या सुमारास जेव्हा ते घरी गेले तेव्हा मागील दरवाजाची आतील कडी तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केल्याचे आढळून आले.

घरातील कपाट फोडून चोरट्यांनी तीन तोळ्यांचे मंगळसूत्र, एक तोळ्याचा नेकलेस, दोन अंगठ्या व कर्णफुले असा अंदाजे पाच तोळ्यांचा सोन्याचा ऐवज चोरून नेला आहे. याशिवाय चांदीची साखळी, गणेशमूर्ती, नाणी, छल्ला, चांदीच्या चार अंगठ्या व अन्य वस्तूंचा समावेश आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक संतोष द‍ळवाई यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. श्वानपथक व ठसेतज्ज्ञांना पाचारण करून चोरांचा माग काढण्याचा प्रयत्न झाला. दळवाई यांच्याकडून तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT