बोरगाव : येथे शॉर्टसर्किटमुळे टेम्पोला अचानक आग लागून संपूर्ण वाहन जळून खाक झाल्याची घटना शनिवारी ( दि.१४) घडली. या आगीत वाहनाचे अंदाजे १३ लाख रुपयांहून अधिक नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
निपाणी येथील प्रशांत भोसले यांच्या मालकीची टेम्पो ट्रॅव्हलर बेडकीहाळ येथून बोरगावच्या दिशेने जात होती. बोरगाव येथील चिरमुरे कारखान्यासमोर वाहन आले असता अचानक वाहनाच्या मागील बाजूने धूर येऊ लागला. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केले. आगीच्या ज्वाळा वेगाने पसरल्याने परिसरात धुराचे मोठे लोट पसरले. त्यामुळे नागरिकांमध्ये एकच धावपळ उडाली.
घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी धाव घेऊन आग विझविण्याचा प्रयत्न केला. सदलगा अग्निशामक दलाचे पथक घटनास्थळी पोहोचेपर्यंत संपूर्ण टेम्पो आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होते.